आता भाजपच्या सभेतही 'ए लाव रे तो व्हिडीओ', राज ठाकरेंना त्यांच्याच स्टाईलने देणार उत्तर
राज ठाकरे ज्या स्टाईलनं आरोप करत आहेत, त्याच स्टाईलनं भाजप 27 तारखेच्या सभेत उत्तर देणार आहोत. आमची राज ठाकरेंना विनंती आहे की, 27 एप्रिलनंतरही त्यांनी त्यांच्या सभा सुरु ठेवाव्या.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांमधून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र आता राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचं भाजपनं ठरवलं आहे. राज ठाकरे मांडत असलेल्या मुद्द्यांची वस्तुस्थिती मांडण्यासाठी भाजपही आपल्या सभेत व्हिडीओ दाखवणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.
राज ठाकरे ज्या स्टाईलनं आरोप करत आहेत, त्याच स्टाईलनं भाजप 27 तारखेच्या सभेत उत्तर देणार आहोत. आमची राज ठाकरेंना विनंती आहे की, 27 एप्रिलनंतरही त्यांनी त्यांच्या सभा सुरु ठेवाव्या. कारण या टुरिंग टॉकीजमुळे जनतेची चांगली करमणूक होत आहे. तसेही राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नाही. त्यामुळे राज ठाकरेंना त्यांची स्टँडअप कॉमेडी सुरु ठेवायला काही हरकत नाही, असा टोला विनोद तावडेंनी लगावला.
परवानगीशिवाय फोटो वापरणं चुकीचं
राज ठाकरेंनी सभेत दाखवलेला चिले कुटुंबाचा फोटो भाजपच्या किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीतला नाही. कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर तो प्रसिद्ध झालेला नाही. हा फोटो एखाद्या मोदीप्रेमीनं सोशल मीडियावर पोस्ट केला असू शकतो. मात्र अशा पद्धतीने फोटो वापरणं चुकीचं असल्याचं विनोद तावडेंनी म्हटलं. राज ठाकरेंच्या नावानंही अनेक पेजेस आहेत, ते सगळेच काही अधिकृत नाहीत. त्यांच्या अधिकृत पेज वर असलेली माहितीच आम्ही खरी मानतो, असं विनोद तावडे यांनी म्हटलं.
चिले परिवारातील सदस्यांनी स्वत:हून सांगितलंय की असा फोटो अपलोड झालाय हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे राज ठाकरेंनी स्वत:हून काहीतरी शोधून काढलं वगैरे असा आव आणू नये, असंही विनोद तावडेंनी म्हटलं.
उद्योगपतींच्या मतावर देशाची लोकशाही टिकून नाही, ती सर्वसामान्यांच्या मतावर ठरते. राज ठाकरेंना हे माहित नाही कारण ते शरद पवारांचं बोट धरुन चालत आहेत, असा टोला विनोद तावडेंनी लगावला.
VIDEO | राज ठाकरेंच्या मंचावर आलेल्या 'मोदी है तो मुमकीन है'मधील कुटुंबाशी बातचीत
पराभव विरोधकांच्या लक्षात आलाय
शरद पवार, चंद्राबाबू नायडू यांनी रशियावरुन ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप केला आहे. नशीब अंतराळातून हॅक होत आहेत, असं नाही म्हटलं. विरोधकांच्या लक्षात आलं आहे, आपण जिंकणार नाही, म्हणून त्यांनी कारणं तयार करायला आतापासूनच सुरुवात केली, असा टोमणा विनोद तावडेंनी लगावला.
VIDEO | मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते भांबावलेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण