लोकसभा निवडणूक 2019 : शेवटच्या दोन टप्प्यात मोदींनी नोटबंदी, जीएसटीवर बोलावं; प्रियांका गांधींचं आव्हान
देशातील तरुणांना खोटी आश्वासनं देऊन तुम्ही सत्तेत आलात, त्या आश्वासनांवर बोलावं, असं आव्हान प्रियांका गांधींनी नरेंद्र मोदींना दिलं.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पुढील दोन टप्प्यात नरेंद्र मोदींनी नोटबंदी आणि जीएसटी या मुद्यांवर बोलावं, असं आव्हान प्रियांका गांधींनी दिलं आहे. प्रियांका गांधी आज शीला दीक्षित यांच्या प्रचारासाठी दिल्लीत बोलत होत्या.
एक दिल्लीची मुलगी तुम्हाला खुलं आव्हान देते की, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यात नरेंद्र मोदींनी नोटबंदी, जीएसटी, महिला सुरक्षा यावर बोलावं. तसेच जी आश्वासनं देऊन तुम्ही सत्तेत आला होतात, त्या मुद्द्यावर सविस्तर बोलून प्रचार करावा. देशातील तरुणांना खोटी आश्वासनं देऊन तुम्ही सत्तेत आलात, त्या आश्वासनांवर बोलावं, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
PG Vadra: Their situation is like those children who don't do their homework&come to school. When teacher asks them they say, 'Kya karoon,Nehru ji ne mera parcha le liya,chhupa diya. Main kya karoon Indira ji ne kagaz ki kashti bana di mere homework ki aur kis paani mein dubo di' https://t.co/wUYBHAUtj8
— ANI (@ANI) May 8, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार आपल्या प्रचार सभांमधील भाषणांमध्ये काँग्रेसवर आरोप करत आहे. यावर बोलतांना प्रियांका गांधी म्हणाल्या की, "आज देशातील स्थिती अशी झाली आहे की, एखादा विद्यार्थी गृहपाठ न करता शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने जाब विचारला की मुलं म्हणतात, माझी वही नेहरुजींनी लपवली. मी काय करु मी गृहपाठ केलेल्या वहीच्या पानांची इंदिरा गांधींनी होडी बनवली आणि पाण्यात बुडवली."
पुढे प्रियांका गांधी म्हणाल्या की, दिल्लीत भाजपचे मोठ मोठे होर्डिंग्स लागले आहेत. मोदीजी पाच वर्षांपूर्वी दिल्लीत आले आहेत, मात्र मी गेल्या 47 वर्षांपासून दिल्ली फिरत आहे. दिल्लीची जनता मोंदींच्या भाषणांना वैतागली आहे, असा टोला प्रियांका गांधींनी लगावला.