एक्स्प्लोर
Loksabha Election 2019 : मुंबईतील महत्त्वाच्या लढती, सहा मतदारसंघांचा आढावा
देशाचं आर्थिक गणित अवलंबून असलेल्या मुंबईतील सहा मतदारसंघात विद्यमान खासदार कोण, कोणत्या पक्षांमध्ये लढत, यापूर्वीची कामगिरी याचा घेतलेला आढावा....
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज (29 एप्रिल) पार पडत आहे. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 मतदारसंघात मतदान होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई,उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या सहा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सहा मतदारसंघात यंदा तब्बल 156 उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. देशाचं आर्थिक गणित अवलंबून असलेल्या मुंबईतील सहा मतदारसंघात विद्यमान खासदार कोण, कोणत्या पक्षांमध्ये लढत, यापूर्वीची कामगिरी याचा घेतलेला आढावा....
1. दक्षिण मुंबई : अरविंद सावंत (शिवसेना) VS मिलिंद देवरा (काँग्रेस)
Mumbai South : उच्चभ्रू परिसरातील हायप्रोफाईल लढत
मुंबईतील उच्चभ्रू परिसर म्हणून दक्षिण मुंबईची ओळख. खरंतर दक्षिण मुंबई या मतदारसंघावर काँग्रेसचच वर्चस्व होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिलिंद देवरा सलग दोन टर्म (2004 ते 2009 आणि 2009 ते 2014) म्हणजेच सलग दहा वर्ष दक्षिण मुंबईचे खासदार होते. पण मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी देवरांना पराभूत केलं होतं.
1952 पासून 1967 पर्यंत ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. जनता दलतर्फे (संयुक्त) लढून जॉर्ज फर्नांडिस यांनी काँग्रेसचा विजयाची साखळी तोडली आणि 1967 च्या निवडणुकीत विजय मिळवला. 1971 मध्ये ही जागा पुन्हा काँग्रेसकडे गेली. 1977 पासून 1984 पर्यंत ही जागा भारतीय लोक दल आणि जनता पक्षाकडे होती. यानंतर 1984 पासून 1996 पर्यंत इथे काँग्रेसच्या मुरली देवरा यांचं वर्चस्व होतं. मग 1996 मध्ये भाजपच्या जयवंतीबेन इथे निवडून आल्या. मात्र 1998 मध्ये मुरली देवरा विजयी झाले. मग 1999 मध्ये पुन्हा जयवंतीबेन मेहतांनी विजय मिळवला. 2004 मध्ये मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि 2014 पर्यंत ही जागा काँग्रेसकडे राहिली. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत मिलिंद देवरा यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे अरविंद सावंत लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. अरविंद सावंत यांनी सुमारे सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी मिलिंद देवरांचा पराभव केला.
विधानसभा मतदारसंघ : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. इथे कोणत्याही पक्षाचं वर्चस्व राहिलेलं नाही. वरळी, शिवडीमध्ये शिवसेना, मलाबार हिल, कुलाबामध्ये भाजप, मुंबादेवीमधून काँग्रेस तर भायखळामधून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचा आमदार आहे.
लढत : यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा मिलिंद देवरा आणि शिवसेनेने अरविंद सावंत यांनाच उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने दक्षिण मुंबईत डॉ. अनिल कुमार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मात्र खरी लढत ही मिलिंद देवरा आणि अरविंद सावंत यांच्यातच होणार आहे.
2. दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे (शिवसेना) VS एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
Mumbai South Central : पारंपरिक गड शिवसेनेने परत मिळवला!
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येते. इथे आमदार काँग्रेसचे आहेत, पण खासदार मात्र शिवसेनेचा आहे. इथे शिवसेनेचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दोन वेळा खासदार असलेल्या काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना पराभूत केलं होतं.
1952 पासून 1989 पर्यंत या जागेवर कधी काँग्रेस तर कधी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं वर्चस्व होतं. विशेष म्हणजे 1984 मध्ये अपक्ष उमेदवाराचा विजय झाला होता. 1989 पासून 2009 पर्यंत म्हणजेच 20 वर्ष इथे शिवसेनेचा दबदबा होता. मोहन रावले यांनी सलग सहा निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा रोवून ठेवला. 2009 मध्ये काँग्रेसने आपली गमावलेली जागा परत मिळवली. पण 2014 च्या मोदी लाटेत ही जागा पुन्हा शिवसेनेच्या खात्यात आली. राहुल शेवाळेंनी एकनाथ गायकवाड यांचा सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
विधानसभा मतदारसंघ : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. अणुशक्ती नगर, चेंबूर आणि माहिममध्ये शिवसेनेचा दबदबा आहे तर सायन कोळीवाड्यात भाजपचा. धारावी आणि वडाळ्यात काँग्रेसचे आमदार आहेत.
लढत : यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे, काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. संजय भोसले यांच्या लढत होणार आहे. पण काँटे की टक्कर शेवाळे आणि गायकवाड यांच्यातच पाहायला मिळत आहे.
VIDEO | मतं उमेदवाराला पडणार की पक्षाला?,काय आहे मुंबईकरांच्या मनात? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
3. उत्तर-मध्य मुंबई : पूनम महाजन (शिवसेना) VS प्रिया दत्त (काँग्रेस)
Mumbai North Central : पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांची रंजक लढत
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार हे सांगणं सध्या कठीण आहे. प्रिया दत्त यांनी वैयक्तिक कारणं देत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नंतर त्यांनी तो निर्णय बदलला आणि सध्या त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. तर या जागेवर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी मुलगी पूनम महाजन खासदार आहेत.
सुनील दत्त यांच्या निधनानंतर उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रिया दत्त यांचा विजय झाला होता. परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीच मोदी लाटेत भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं. पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा जवळपास 1 लाख 86 हजार मतांना पराभव केला. त्याआधी 2009 मध्ये प्रिया दत्त यांनी भाजपच्या महेश राम जेठमलानी यांना पराभूत केलं होतं.
या जागेवर कोणत्याही पक्षाचा दबदबा राहिलेला नाही. कधी इथे काँग्रेसचा विजय झाला तर कधी भाजपचा, विशेष म्हणजे आरपीआयचा उमेदवारही इथे विजयी झाला होता. 1999 मध्ये शिवसेनेच्या मनोहर जोशी तर 1998 मध्ये आरपीआयच्या रामदास आठवलेंनी ही जागा जिंकली होती. त्याआधी 1980 मध्ये जनता पक्षाच्या प्रमिला मधु दंडवते यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर मात केली होती. तर 1977 मध्ये या जागेवर सीपीआय (एम) यांनी अहिल्या रांगेकर यांना विजय मिळाला होता.
विधानसभा मतदारसंघ : उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विले पार्ले, चांदिवली कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि कलिना हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. कुर्ला, कलिना आणि वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. तर वांद्रे पश्चिम आणि विलेपार्लेमध्ये भाजपचे. चांदिवली जागा काँग्रेसच्या खात्यात आहे.
लढत : उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त या दोन महिला उमेदवारांमध्ये महत्त्वपूर्ण लढत होणार आहे.
4. ईशान्य मुंबई : संजयदिना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) VS मनोज कोटक (भाजप)
Mumbai North East : 35 वर्षांपासून उलटफेरचा साक्षीदार असलेला मतदारसंघ
जागावाटपात सर्वात हायव्होल्टेज ड्रामा झालेला मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई. 1967 पासून 1980 पर्यंत इथे सलग तीन वेळा, काँग्रेसचे दोन वेळा जनता पक्षाचे खासदार होते. यानंतर सत्ताधाऱ्यांना बदलण्याचा जो सिलसिला सुरु झाला, तो अद्यापही कायम आहे.
1980 मध्ये या जागेवर जनता पक्षाचे सुब्रमण्यम स्वामी खासदार होते. यानंतर 1984 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 1989 मध्ये भाजपच्या जयवंतीबेन मेहता, 1991 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 1996 मध्ये भाजपचे प्रमोद महाजन, 1998 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 1999 मध्ये भाजपचे किरीट सोमय्या, 2004 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयदिना पाटील आणि 2014 मध्ये भाजपचे किरीट सोमय्या खासदार होते. अशाप्रकारे 35 वर्षांमध्ये हा मतदारसंघ सातत्याने परिवर्तनाचा साक्षीदार राहिला होता.
विधानसभा मतदारसंघ : उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जागांवर भाजप-शिवसेना पक्षांचं वर्चस्व आहे. मुलुंड, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्वमध्ये भाजपचे आमदार आहेत तर विक्रोळी आणि भांडुप पश्चिममध्ये शिवसेनेचे. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अबु आझमी आमदार आहेत.
लढत : 2014 च्या निवडणुकीत किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजयदिना पाटील यांना सुमारे सव्वा तीन लाख मतांनी पराभव केला होता. मात्र यंदा किरीट सोमय्यांना उमेदवारी मिळालेली नाही. किरीट सोमय्यांना उमेदवारी द्यायची की नाही यावरुन इथे वाद रंगला होता. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे शिवसेनेने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. अखेर भाजपने सोमय्यांचा पत्ता कापून मनोज कोटक यांना इथे उमेदवारी दिली. यंदा इथे राष्ट्रवादीच्या संजयदिना पाटील आणि मनोज कोटक यांच्यात लढत होणार आहे.
5. उत्तर पश्चिम मुंबई : गजानन किर्तीकर (शिवसेना) VS संजय निरुपम (काँग्रेस)
Mumbai North West : एकेकाळी सिनेसृष्टीचा दबदबा असलेला मतदारसंघ
एकेकीळी देशातील सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ. अभिनेत्यापासून नेते बनलेले सुनील दत्त यांच्यामुळे हा मतदारसंघ प्रसिद्ध झाला होता. सुनील दत्त यांनी काँग्रेसच्या तिकीटावर इथे 18 वर्ष खासदार होते. या जागेवर अनेक रोमांचक लढतीही झाल्या. या मतदारसंघावर सिनेसृष्टीतील लोकांचाच दबदबा राहिला. पण शिवसेनेने हा दबदबा मोडून काढला आणि 2014 मध्ये इथे विजय मिळवाला. 2014 मध्ये शिवसेनेचे गजानन किर्तीकर इथे विजयी झाले.
1967 पासून 1977 पर्यंत ही जागा काँग्रेसकडे होती आणि त्यानंतर ख्यातनाम वकील राम जेठमलानी आधी जनता पक्ष मग भाजपचे खासदार बनले. यानंतर1984 पासून 1996 पर्यंत काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांचं मतदारसंघावर वर्चस्व राहिलं. मात्र 1996 आणि 1998 मध्ये शिवसेनेलाही इथे विजय मिळाल. मग 1999 मध्ये ही जागा पुन्हा सुनील दत्त यांच्याकडे आली. 2005 मध्ये सुनील दत्त यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त इथून खासदार झाल्य. 2009 मध्येही ही जागा काँग्रेसकडेच होती. पण 2014 मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी या जागेवर विजय मिळवला.
विधानसभा मतदारसंघ : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात. इथे पूर्णत: शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व आहे. गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे आमदार आहेत. जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी आणि अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत.
लढत : 2014 च्या निवडणुकीत गजानन किर्तीकर यांनी गुरुदास कामत यांचा सुमारे 1 लाख 80 हजार मतांनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत विद्यमान खासदार गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्यात प्रमुख लढत आहे.
6. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी (भाजप) VS उर्मिला मातोंडकर
Mumbai North : भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसचं आव्हान
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा मूड आता परिवर्तन झाला आहे. एकेकाळी इथे भाजपचे राम नाईक पाच वेळा खासदार होते. मग त्यांना अभिनेता गोविंदाकडून आव्हान मिळालं. गोविंदाने इथे काँग्रेसचा झेंडा फडकावला. नंतर काँग्रेसकडूनच संजय निरुपम इथे जिंकले. मग 2014 मध्ये मोदी लाटेत केवळ संजय निरुपम यांचाच पराभव झाला नाही तर गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसला रसातळाला पाठवलं. काँग्रेसचा इथे दारुण पराभव झाला. यंदाही गोपाळ शेट्टीच भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिली आहे.
1952 मध्ये या जागी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या श्रीपाद अमृत डांगे यांनी जिंकली होती. त्यानंतर वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी इथे विजय मिळवला. तर एकदा ही जागा भाजपच्या खात्यात गेली होती. 1989 पासून 2004 पर्यंत सलग तीन लोकसभा निवडणुकीत राम नाईक यांचा इथे विजय झाला होता. 2004 मध्ये त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर लढलेला अभिनेता गोविंदाकडून आव्हान मिळालं, ज्यात गोविंदाने त्यांच्यावर मात केली. यानंतर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले संजय निरुपम 2009 मध्ये इथून खासदार बनले. त्यांनीही भाजपच्या राम नाईक यांना कमी फरकाने पराभूत केलं. 2014 मध्ये मोदी लाटेत ही जागा पुन्हा एकदा भाजपकडे आली. इथे गोपाळ शेट्टींना तब्बल साडे चार लाख मतांनी विजय मिळाला.
विधानसभा मतदारसंघ : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बोरीवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दबदबा आहे. इथे बोरीवली, दहिसर, कांदिवली पूर्व आणि चारकोपमध्ये भाजप, मागाठणेमध्ये शिवसेना तर मालाड पश्चिम मतदारसंघ काँग्रेसच्या खात्यात आहे.
लढत : यंदाच्या निवडणुकीत इथे काँग्रेस विरुद्ध भाजप सामना पाहायला मिळणार आहे. बऱ्याच वर्षांनी या मतदारसंघात काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने इथे मराठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे भाजपच्या गोपाळ शेट्टी यांना उर्मिला मातोंडकरचं आव्हान आहे.
VIDEO | मतदार यादीत अनेक घोळ, पोलिंग बूध एजंट्ससोबत खास बातचीत | मुंबई | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement