महाराष्ट्र काँग्रेसची मोठी वाताहत, निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार बदण्याची नामुष्की
चंद्रपूरनंतर आता औरंगाबादमध्ये तिकीट न मिळाल्यानं नाराज असलेले अब्दुल सत्तार यांच्यासाठी काँग्रेस आता औरंगाबाद किंवा जालन्याचा उमेदवार बदलणार का? असा प्रश्न पुढे येत आहे.
मुंबई : देशात आणि राज्यात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाची आज वाताहात झाली आहे. लोकसभे निवडणुकीत नव्या दमात आणि जोमाने उतरलेल्या काँग्रेसवर निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे, तर दिग्गज नेते पक्षाला राम राम ठोकत आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी स्वत: राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशोक चव्हाण यांच्या संभाषणाची तशी ऑडिओ काल समोर आली होती. तिकीट वाटपावरुन नाराज झालेल्या कार्यकर्त्याला उत्तर देताना माझं पक्षात कुणी ऐकत नाही अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली होती. अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यातून काँग्रेसमधील गटबाजीची झलक पाहायला मिळली.
त्यानंतर अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर चंद्रपुरातील उमेदरवार बदलण्यात आला. चंद्रपूर येथे विनायक बांगडे यांना जाहीर केलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी आता सुरेश (बाळू) धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तशीच स्थिती औरंगाबादमध्ये निर्माण झाली आहे.
औरंगाबादमध्ये तिकीट न मिळाल्यानं नाराज असलेले अब्दुल सत्तार यांच्यासाठी काँग्रेस आता औरंगाबाद किंवा जालन्याचा उमेदवार बदलणार का? असा प्रश्न पुढे येत आहे. कारण, माझ्यासाठी अशोक चव्हाण औरंगाबाद किंवा जालन्याचा उमेदवार बदलून देण्यास तयार आहेत, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे इतर पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले असताना काँग्रेस मात्र अजूनही उमेदवार बदण्यात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.