Lok Sabha Election Result 2024 : नारायण राणे ते संदिपान भुमरे केंद्र राज्यातले मंत्री लोकसभेच्या रिंगणात, दिल्लीचं तिकीट कुणाला?
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्रात केंद्र आणि राज्यातील मंत्री होते. नारायण राणे ते सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या रिंगणात होते.
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीतर्फे भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना, अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election Result) लढवली. भाजपनं (BJP) बऱ्याच ठिकाणी विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात काम करणाऱ्या मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरवलं गेलं. तर, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री लोकसभेच्या रिंगणात आहेत. केंद्रातील कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) , पियूष गोयल (Piyush Goyal), केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil), भारती पवार (Bharati Pawar), रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) लोकसभेच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे राज्यामधील भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) तर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) लोकसभेच्या रिंगणात आहेत. यापैकी कुणाला दिल्लीचं तिकीट मिळतं हे पाहावं लागेल.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपच्या चिन्हावर लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत रिंगणात आहेत. विनायक राऊत गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. यावेळी नारायण राणे यांनी त्यांच्या पारंपरिक विरोधकांशी जुळवून घेत लोकसभेचं गणित मांडण्याचं प्रयत्न केला आहे. या मतदारसंघात कोण विजयी होतं ते पाहावं लागेल.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातू केंद्रीय मंत्री पियूष गोयल लोकसभेच्या रिंगणात आहेत. पियूष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील रिंगणात आहेत. या मतदारसंघात यापूर्वी भाजपचे गोपाळ शेट्टी लोकसभेचे खासदार होते.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. यावेळी त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचं आव्हान होतं. जागा वाटपाच्या चर्चेत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आला होता.
जालन्यातून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होतीय. जालन्यात काँग्रेसचे कल्याणराव काळे लोकसभेच्या रिंगणात आहेत. याशिवाय मराठा आरक्षण आंदोलक मंगेश साबळे देखील लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यामुळं या मतदारसंघात मत विभाजन झाल्यास याचा फायदा कुणाला होईल हे पाहावं लागेल.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. इथं त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार भास्कर भगरे रिंगणात आहेत. इथं कांदा उत्पादकांचा प्रश्न गंभीर होता. त्यामुळं इथं कोण बाजी मारणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.
सुधीर मुनगंटीवार अन् संदिपान भुमरे लोकसभेच्या रिंगणात
केंद्रीय मंत्र्यांप्रमाणं महाराष्ट्रातील मंत्री देखील लोकसभेच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या रिंगणात होते. चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर होत्या.प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूनं असलेला सहानुभुतीचा फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे निवडणूक लढत आहेत. संदिपान भुमरे यांच्या विरोधात विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे प्रमुख उमेदवार या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
संबंधित बातम्या :
मावळकरांच्या मनातील खरी शिवसेना कोणती?, श्रीरंग बारणे की संजोग वाघेरे; चर्चेतील मतदारसंघाचा निकाल