दिंडोरीत भास्कर भगरे ठरले 'जायंट किलर', केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचा दारूण पराभव, निकालाची वैशिष्ट्य काय?
Dindori Lok Sabha Election Result 2024 : दिंडोरीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी विजय मिळवला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा पराभव करून भगरे हे जायंट किलर ठरले आहेत.
Dindori Lok Sabha Election Result 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यापासून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना कमालीचा विरोध कांदा उत्पादकांबरोबरच सामान्य मतदारांचा होता. त्यामुळे येथे अपेक्षेनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतिशय नवखे उमेदवार असलेल्या भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी विजय संपादन केला. केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करून भगरे हे जायंट किलर ठरले आहेत.
भास्कर भगरे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत 1 लाख 13 हजार 199 इतक्या मतांनी विजयाला गवसणी घातली. भगरे यांना 5 लाख 77 हजार 339 इतकी तर भारती पवार यांना 4 लाख 64 हजार 140 इतकी मिळाली. दिंडोरी मतदारसंघात एकूण दहा उमेदवार रिंगणात होते.
20 वर्षांचा बालेकिल्ला शरद पवार गटाकडून सर
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतांचा टक्का वाढला होता. भाजपाचा सलग वीस वर्षापासूनचा बालेकिल्ला राष्ट्रवादी शरद पवार गटाने यावेळी सर केला. भाजपाने येथे भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांना रिंगणात उतरविले होते.प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून भारती पवार यांना मतदारांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले होते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर गेल्या वीस वर्षांपासून भाजपाचे वर्चस्व होते. या मतदारसंघात दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, कळवणमधून नितीन पवार, निफाडमधून दिलीप बनकर, देवळ्यातून राहुल आहेर, नांदगावमधून सुहास कांदे, येवल्यातून छगन भुजबळ असे सहा आमदार भारती पवार यांच्या बाजूने होते.
कांद्याच्या मुद्याभोवतीच निवडणूक फिरली
तर भास्कर भगरे यांच्या बाजूने येवल्याचे नरेंद्र दराडे, निफाडचे माजी आमदार अनिल कदम, चांदवडमधून शिरीष कोतवाल हेच खिंड लढवत होते. दिंडोरी मतदारसंघात कांद्याच्या मुद्याभोवतीच संपूर्ण निवडणूक फिरली. भारती पवार यांचे होम ग्राउंड असलेल्या कळवणमध्ये देखील भास्कर भगरे यांचीच जादू चालली. पहिल्या फेरीपासून भास्कर भगरे यांनी आघाडी घेतली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद असूनही भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. दिंडोरी लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे नवखे असूनही त्यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवार यांना पराभवाची धूळ चारण्याचा करिष्मा केला.
दिंडोरी लोकसभेच्या निकालाची वैशिष्ट्य
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव आणि चांदवड मतदार संघात महायुतीच्या डॉ. भारती पवार यांनी आघाडी घेतली होती. कळवण, येवला, निफाड, दिंडोरी या चारही मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार आहेत. तरी या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी सर्वाधिक मते घेतली आहे. वीस वर्षानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा गड भाजपच्या हातून निसटला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निवडणूक लढली गेली होती. कांदा उत्पादक, शेतकऱ्यांची नाराजी मतातून दिसून आली. दिंडोरीत सर्वाधिक आमदार महायुतीचे असूनही पवारांचा पराभवाचा सामना करावा लागला.
शेतकरी धोरणाचा फटका
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीचा मोठा फटका दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारती पवार यांना बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली. ही सभा गेमचेंजर ठरेल, असा विश्वास भारती पवार यांच्यासह भाजपाच्या मंडळींना होता. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. उलट मोदी यांच्या सभेत एका तरुणाने कांद्यावर बोला, अशी घोषणाबाजी केली. त्यावर मोदी यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये मोदी फक्त धर्माच्या नावाखाली मते मागतात, हा संदेश गेल्याची चर्चा आहे.
विधानसभा निहाय झालेले मतदान
नांदगाव विधानसभा (सुहास कांदे- शिंदे गट)
- भास्कर भगरे - 61336
- डॉ.भारती पवार- 103001*
- बाबु सदू भगरे सर - 12288
कळवण विधानसभा (नितीन पवार - अजित पवार गट)
- भास्कर भगरे -114134*
- डॉ.भारती पवार-56461
- बाबु सदू भगरे सर- 20843
चांदवड विधानसभा ( राहुल आहेर- भाजप)
- भास्कर भगरे -78578
- डॉ.भारती पवार-95325*
- बाबु सदू भगरे सर- 12509
येवला विधानसभा (छगन भुजबळ- अजित पवार गट)
- भास्कर भगरे -93500*
- डॉ. भारती पवार-80295
- बाबु सदू भगरे सर-16039
निफाड विधानसभा (दिलीप बनकर अजित पवार गट)
- भास्कर भगरे - 89554*
- डॉ.भारती पवार- 71370
- बाबु सदू भगरे सर-14414
पेठ-दिंडोरी विधानसभा.( नरहरी झिरवाळ- अजित पवार गट)
- भास्कर भगरे- 138189*
- डॉ. भारती पवार - 55881
- बाबु सदू भगरे सर-27442
एकूण झालेले मतदान - 1241985
- ग्राह्य मतदान - 1232664
- बाद मतदान- 1075
- नोटा - 8246
एकूण पोस्टल मतदान- 5310
ग्राह्य मतदान- 4195*
बाद मते- 1075
भास्कर भगरे - 2048
डॉ. भारती पवार- 1807
बाबु सदू भगरे सर- 106
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
आणखी वाचा