एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ | ‘अमल’ कायम की ऋतु(राज) बदलणार? कोल्हापूरकरांचं काय ठरलंय?
बंटी पाटलांनी ऋतुराजना पुढे करून स्वत:ची आमदारकी कायम ठेवलीच शिवाय महादेवराव महाडिकांची संभाव्य आमदारकी बाद केली. त्यामुळे आता होणारी अमल महाडीक विरूद्ध ऋतुराज पाटील ही लढत तुल्यबळ आणि तुंबळ अशी दोन्ही होणार आहे.
महाराष्ट्रातल्या पहिल्या 10 लक्षवेधी लढतींपैकी कोल्हापूर दक्षिणची लढत असेल हे नक्की. चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांनाही ज्यावर सिनेमा काढावा वाटला असता असा या मतदारसंघातील राजकीय थरारपट आहे. या मतदारसंघाच्या राजकारणात त्यासाठी लागणारं सारं काही आहे. दोन कुटुंबांमधली तेढ, जीवापाड मैत्रीचं ‘पाडापाड’ राजकीय वैरात झालेलं रूपांतर, राजकारणातले कुटील डाव, पक्षाबिक्षाच्या पलिकडचं व्यक्ती आणि त्यांच्या गटांचं समीकरण आणि कोल्हापूरच्या रांगड्या कुस्तीसारखा अटीतटीचा सामना. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात राजकीय पक्षांच्या नावांना अर्थ नाही. इथं सगळा मामला म्हणजे महाडिक विरूद्ध पाटील. त्यातही यातले पाटील म्हणजे काँग्रेसचे विधान परिषदेतले आमदार सतेज पाटील. तर, महाडिक हे मात्र आख्खं घराणं आहे. ज्यात महादेवराव महाडिक, त्यांचे पुत्र आणि सध्याचे भाजपचे सिटींग आमदार अमल महाडिक, त्यांचे चुलत भाऊ आणि गेल्या लोकसभेत राष्ट्रवादीकडून उभे राहिलेले मात्र पराभूत झालेले आणि आता भाजपात गेलेले धनंजय महाडिक हे होत. या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाच्या खोलात जाताना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भही पाहावा लागतो.
हे ही वाचा -राजापूर मतदारसंघ : शिवसेनेचे राजन साळवी हॅटट्रिक करणार?
‘आमचं ठरलंय’ ही सतेज पाटील गटाची २०१९च्या लोकसभेसाठीची घोषणा होती. काय ठरलं होतं?...राष्ट्रवादीच्या म्हणजेच आपल्याच मित्र पक्षाच्या उमेदवाराला-धनंजय महाडिकांना पाडणं. तसंच झालं. शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक निवडून आले. आता याला पुन्हा संदर्भ आहे 2009 आणि 2014च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांना सतेज (बंटी) पाटलांनी सर्व ताकदिनीशी सहकार्य केलं. तोपर्यंत धनंजय महाडिक आणि सतेज पाटलांच्या मैत्रीचे दाखले कोल्हापूरकर देत असत. मात्र दोघांचीही महत्वकांक्षा आणि जिल्ह्याचा नेता कोण ? यातील स्पर्धा या मैत्रीच्या आड येत होती.
सतेज पाटील हे काँग्रेसचे नेतृत्व करणारे तर धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे दोघांचेही गट सक्षम असल्यामुळे दोन्ही गटांमध्ये वेगवेगळ्या कारणाने नेहमीच धुसफूस होत राहायचे, नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांमध्येच 'मी मोठा की तु मोठा?' यावरून अनेक वादही निर्माण व्हायचे. याचा परिणाम दोन्ही गटांवर आणि दोन्ही नेत्यांवरही झाला. 2014च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही धनंजय महाडिक निवडून आले. त्यावेळी सतेज पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धनंजय महाडिक यांच्या पाठीमागे उभं राहण्यास सांगितलं. धनंजय महाडिक गटाने मात्र ही गोष्ट मान्य केली नाही. परिणामी, नेहमीप्रमाणेच पाटील गटाने महाडिक गटाच्या पाठीत खंजीर खुपसला अशी चर्चा कोल्हापुरात मोठ्याप्रमाणात रंगली होती. निवडणुकीतल्या सभांमध्ये एकमेकांवर केलेली चिखलफेक यामुळे दोन्ही गटांची मनं दुखावली. त्यानंतर मात्र या दोन्ही गटातून विस्तवही जात नव्हता आणि ही मैत्री दुश्मनीमध्ये बदलली. पुढे मोदी लाटेतही महाडिक खासदार म्हणून निवडून आले. नंतर लगेचच आलेल्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांना ताकद देण्याची पाळी महाडिकांची होती, मात्र घडलं वेगळंच. धनंजय महाडिकांचे चुलत भाऊ अमल महाडिक भाजपतर्फे उभे राहिले. रक्ताच्या नात्यापुढे मैत्रीचं पाणी अळवावरचं ठरलं. महाडिकांनी भावाची मदत केल्याचा आरोप बंटी पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी केला. बंटी पाटील विधानसभा हरले. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बंटी पाटलांचं ‘ठरलं’ आणि धनंजय महाडिकांचा शिवसेनेच्या प्रा. संजय मंडलिकांकडून पराभव झाला. आता तर स्वत: महाडिकच भाजपात आलेत. यानंतर आता तोंडावर आलीये ती विधानसभा निवडणूक...
हे देखील वाचा -बार्शी विधानसभा । बार्शी तिथं कुणाची व्हणार सरशी, 'साहेब' की 'भाऊ' कोण मारणार बाजी?
धनंजय महाडिकांचे भाऊ अमल हे भाजपचेच आमदार आहेत. त्यांचं तिकिट पक्कं मानलं जातंय. जोडीला आता धनंजय महाडिकही भाजपात आलेत (आता या पक्षांतरालाही फक्त भाजपची हवा कारणीभूत नाही. राष्ट्रवादीत धनंजय महाडिक यांना कसकसे अनुभव आले, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही धनंजय महाडिकांना जाणून-बुजून लोकसभा निवडणुकीत कसं पाडलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कसं दूर ठेवण्यात आलं आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खासदार धनंजय महाडिक यांना कसं आपलं ते मानलंच नाही असे अनेक संदर्भ आहेत). तर दुसरीकडे, काँग्रेसतर्फे ऋतुराज पाटलांचं नाव जाहीर करण्याची औपचारिकताच बाकी आहे. चेहरा ऋतुराज यांचा असला तरी लोकांना माहित्येय की लढणार आहेत ते बंटी पाटीलच. आता यातही एक वेगळंच शह-काटशहाचं राजकारण आहे. बंटी पाटील विधान परिषेदवर आमदार आहेत. त्यांची आणखी तीन वर्ष टर्म बाकी आहे. ते समजा यंदा उभे राहिले असते आणि निवडून आले असते, तर त्यांना परिषदेचं सदस्यत्व सोडावं लागलं असतं. ती जागा स्थानिक स्वराज्य संस्थेवरून निवडणून येण्यासाठी आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेवरील भाजप समर्थक आणि कोल्हापूर मनपातील महाडिकांची ताराराणी आघाडी या फॅक्टरमुळे अमल महाडिकांचे वडील आणि नेते महादेवराव महाडिक विधान परिषदेवर जाऊ शकले असते. मात्र, बंटी पाटलांनी ऋतुराजना पुढे करून स्वत:ची आमदारकी कायम ठेवलीच शिवाय महादेवराव महाडिकांची संभाव्य आमदारकी बाद केली. त्यामुळे आता होणारी अमल महाडीक विरूद्ध ऋतुराज पाटील ही लढत तुल्यबळ आणि तुंबळ अशी दोन्ही होणार आहे.
हे ही वाचा -भोकर विधानसभा मतदारसंघ | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांपुढे अस्तित्व टिकवण्याचं आव्हान
गंमत म्हणजे शिवसेना खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी ऋतुराज पाटलांना जाहीर पाठिंबा देऊ केलाय. म्हणजेच महाडिकांविरूद्ध त्यांच्यावर नाराज असलेले राष्ट्रवादीवाले, बंटी पाटलांचे म्हणजेच काँग्रेस आणि जोडीला शिवसेनेचे मंडलिक असं तिहेरी आव्हान आहे. गेल्या लोकसभेत जसा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत सामना झाला तसाच आता एकप्रकारे आता भाजप-सेनेत होणार आहे.
कसा आहे कोल्हापूर दक्षिण (274) मतदारसंघ-
या मतदार संघात मराठा, ओबीसी, धनगर असा मिश्र मतदार आहे. मराठा समाजचं वर्चस्व आहे. जवळपास निम्मा शहरी आणि निम्मा ग्रामीण अशी याची भौगोलिक विभागणी आहे. 2009 साली मतदारसंघ तयार झाला. त्यापूर्वी हा मतदारसंघ करवीर मतदारसंघाचा भाग होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अमल महाडिक यांना 1,05,489 मतं तर सतेज पाटील यांना 96,961 मतं मिळाली होती. एकूण मतदान- 2,17,169.
जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
- मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
- साक्री विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?
- बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
- जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती
- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- येवला-लासलगाव मतदारसंघ | छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?
- अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
- परभणी विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या खेळीने शिवसेना अडचणीत
- मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement