एक्स्प्लोर
Advertisement
इगतपुरी विधानसभा मतदारसंघ : निर्मला गावितांच्या शिवसेना प्रवेशाने सर्वच पक्ष हवालदिल
निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेलं इगतपुरी मुंबईकरांचं हक्काचं टुरिस्ट डेस्टिनेशन. पण नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या राखीव मतदारसंघाचं स्थान महत्वाचं आहे. अलीकडेच काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करून मतदारसंघात राजकीय भूकंप केलाय.
विधानसभा निवडणुकी आधीच भूकंप घडविणारा नाशिक जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ म्हणून इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाची ओळख निर्माण झालीय. निर्मला गावित या निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या पहिल्या विद्यमान आमदार ठरल्या. याआधी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार धनराज महाले यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादीला रामराम ठोकून पुन्हा शिवबंधन बांधलं. मात्र सलग दोन वेळा कॉंग्रेसच्या तिकिटावर विजय संपादन करून विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या गावित यांनी पंजाची साथ सोडून धनुष्यबाण हाती धरलाय.
इगतपुरीमध्ये गावित घराणे आणि कॉंग्रेस हे समीकरण होते. त्यांचे वडील माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित सलग नऊ टर्म नंदुरबारचे खासदार होते. त्यांच्याच वारसा निर्मला यांनी सुरु केला. सुरवातीला नाशिक महापालिकेत नगरसेविका राहिलेल्या निर्मला गावित यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. 29 हजार 155 मते मिळवीत विजय मिळवला. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ सुरवातीपासूनच काँग्रेसचा गड राहिलाय तर दोन वेळा इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पसंती दिलीय.
1980 पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास 1980, 1985, 1995, 2009 आणि 2014 अशा पाच निवडणुकात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. तर 1999 आणि 2004 या सलग दोन निवडणुकामध्ये शिवसेनेचा भगवा मतदार संघावर फडकला आहे. 1999 मध्ये पांडुरंग गांगड तर 2004 मध्ये काशिनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. 1990 च्या एकाच निवडणुकीत मात्र यादवराव वांबळे यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुललं.
नाशिक मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला मतदार संघाचा विस्तार आहे. आदिवासी बहुल या मतदारसंघात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, घोटी, वाडीवऱ्हे आणि गोंदे हे मुख्य भाग येतात. भात हे मतदारसंघातील शेतकऱ्याचं प्रमुख पिक आहे. वाडीवऱ्हे, गोंदे या भागात औद्योगिक वसाहत आहे. बारा ज्योतीर्लींगापैकी एक असणारं त्र्यंबकेश्वर देवस्थान, संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर, सर्वतीर्थ टाकेद अशी महत्वाची धार्मिक स्थळे आणि मनशांतीसाठी जगभरातील पर्यटकाची पावलं वळवणारे धम्मगिरी याच मतदार संघात आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारा, सर्वाधिक धरणे असणारा परिसर, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला परिसर म्हणून या भागाची ओळख आहे. असा आदिवासी, कष्टकरी, कामगार अशा सर्वाना सामावून घेणारा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. मात्र चांगल्या रस्त्यांचा अभाव, सर्वाधिक पावसाचा परिसर असूनही वाड्या वस्त्यावर ऐन पावसाळ्यातही पाणी टंचाईची समस्या, शासकीय योजनांचा बट्याबोळ, ग्रामीण आरोग्य केंद्रातली असुविधा, शाळांची दुर्दशा अशा अनेक नकारात्मक बाबी आहेत. मात्र त्या सोडविण्यासाठी फारसे प्रयत्न होत नसल्याची मतदारांची ओरड आहे. छोट्या छोट्या वाड्या वस्त्यामध्ये मतदार संघ विखुरला गेल्याने हर्सूल ठाणापाडा या भागात पारंपारिक कम्युनिस्टाचा प्रभाव आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. इगतपुरीत शिवसेनेचा भगवा तर ग्रामीण भागात कॉंग्रेसची ताकद बघायला मिळते. मोदी लाटेतही आपल्या विजयाची पताका फडकवणाऱ्या निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मतदारसंघातील सर्व समीकरणेच बदलेली आहेत. ऐनवेळी कॉंग्रेसला उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागतेय. शिवसेनेतून इच्छुक असणाऱ्या माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, कॉंग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा आमदारकी जिंकणारे आणि मागील निवडणुकीत शिवसेनच्या तिकिटावर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे शिवराम झोले यांच्या इच्छा-आकाशांवर पाणी फेरलं गेलं आहे. शिवराम झोले आता बंडाचा झेंडा फडकविण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे यांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली होती. मात्र त्यांची इच्छा मनातच राहते की काय अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुन्हा एकदा हिरामण खोसकर इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत त्यांना २१ हजार ७४६ मतांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.
निर्मला गावित हॅटट्रिकच्या तयारीत असल्याने त्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी शिवसेनेतील नाराज गटाला हाताशी धरून सर्वपक्षीय नेत्यांचा एकच उमेदवार देऊन गावित यांच्या समोर आव्हान उभे करण्याची रणनीती आखली जातेय. शिवसेना पक्ष प्रमुखांचा आदेश झुगारुन बंड पुकारून नाराजांचा गट पक्षासमोर आव्हान उभे करणार का? सर्वपक्षीयांची एक मोट बांधली जाणार का? जर एकमत झालंच तर मग उमेदवार कोण असणार? कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निर्मला गावितांना आव्हान दिलं जाणार? अनेक प्रश्न इगतपुरीमध्ये चवीने चर्चिले जात आहेत.
इगतपुरी : २०१४ च्या निवडणुकीतील मतदान
निर्मला गावित (कॉंग्रेस) ४९ हजार १२८ मते
शिवराम झोले (शिवसेना) ३८ हजार ७५१
हिरामण खोसकर (राष्ट्रवादी) २१ हजार ७४६
काशिनाथ मेंगाळ (अपक्ष) १७ हजार १६७
चंद्रकांत खाडे (भाजप) ११ हजार २५०इगतपुरी मतदारसंघातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते
हेमंत गोडसे (शिवसेना) ६८ हजार ९७०
समीर भुजबळ (राष्टवादी) ६३ हजार ५१८
माणिकराव कोकाटे (अपक्ष) १३ हजार ६७०
पवन पवार (वंचित बहुजन) १५ हजार ११७
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement