ममता, नितीश-अखिलेश आणि शरद पवार एकत्र आले, तर काय असेल राजकीय गणित? जाणून घ्या
Lok Sabha 2024 Elections: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या गाठीभेटी सुरु झाली आहे.
Lok Sabha 2024 Elections: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या गाठीभेटी सुरु झाली आहे. भाजपने पुन्हा सत्ता काबीज करण्याची आपली रणनीती ठरवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधी पक्ष तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
काँग्रेससोबतच बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश , महाराष्ट्र आणि अगदी दक्षिणेतील तेलंगणातील विरोधी पक्ष नेते भाजपला पराभूत करण्यासाठी योजना आखत आहेत. बिहारमधूनही हा नारा सध्या राजकीय वर्तुळात घुमू लागला आहे की, विरोधक एकत्र आले तर 2024 मध्ये भाजपला पराभव होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्ष नेते कोणती योजना आखात आहे? त्याआधी लोकसभा निवडणुकीचे गणित समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणूक ही एखाद्या उत्सवा सारखी असते. याच्या आधारे देश चालवण्यासाठी सरकार निवडली जाते. भारतीय राज्यघटनेने सभागृहाची कमाल सदस्यसंख्या 552 निश्चित केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 मध्ये ही संख्या 500 होती. सध्या सभागृहाचे संख्याबळ 545 असून त्यात सभापती आणि अँग्लो-इंडियन समुदायाचे दोन नामनिर्देशित सदस्य आहेत. त्यापैकी 543 जागांसाठी निवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीत 131 राखीव जागा आहेत.
काय आहे सध्याची परिस्थिती?
भारतातील प्रत्येक राज्याला लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेचे सदस्य मिळतात. सध्याचे लोकसभा सदस्य 1971 च्या लोकसंख्येवर आधारित आहे. 2026 मध्ये पुढील वेळेसाठी लोकसभेच्या सदस्यांची संख्या निश्चित केली जाईल. सध्या राज्यांच्या लोकसंख्येनुसार वाटल्या जाणाऱ्या जागांच्या संख्येनुसार उत्तर भारताचे प्रतिनिधित्व दक्षिण भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. दक्षिणेकडील चार राज्ये, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ यांना लोकसभेच्या 129 जागा देण्यात आल्या आहेत. तर या राज्यांची एकत्रित लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या केवळ 21 टक्के आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि बिहार या सर्वाधिक लोकसंख्येच्या हिंदी भाषिक राज्यांच्या खात्यात केवळ 120 जागा येतात. या राज्यांची एकत्रित लोकसंख्या ही देशाच्या लोकसंख्येच्या 25.1 टक्के आहे. लोकसभेच्या जागा 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागल्या आहेत.
किती आहे विरोधी पक्षांची ताकद?
लोकसभा जागांच्या बाबतीत पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. बिहारमध्ये 40 लोकसभेच्या जागा आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 80 लोकसभेच्या जागा आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. तेलंगणाबद्दल बोलायचे झाले तर तेथे लोकसभेच्या 17 जागा आहेत. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असोत वा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असोत किंवा सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार असोत, यापैकी कुणाचाही आपल्या राज्याबाहेर तितकीशी ताकद नाही आहे. म्हणून आपल्या राज्याबाहेर एकही खासदार निवडणून आणणे त्यांच्यासाठी कठीण आहे. असं असलं तरी यावेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग भाजपसाठीही सोपा नाही. 2019 च्या तुलनेत यावेळी परिस्थिती खूप बदलली आहे. त्यामुळेच पक्ष प्रत्येक जागेसाठी वेगळी योजना बनवत आहे. खुद्द अमित शाह यात आघाडीवर उभे आहेत. गेल्या तीन वर्षांत एनडीएच्या अनेक मित्रपक्षांनी त्यांची साथ सोडली. यामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कोणाचं पारडं जड ठरेल, हे 2024 मध्येच समजू शकेल.