Devendra Fadnavis: मैं तो पर्मनंट हूँ, अजित पवारांवरील मीम, देवेंद्र फडणवीसांनी किस्सा सांगितला
Devendra Fadnavis on Meme: निवडणुकीचा निकाल लागल्यापासून शपथविधीपर्यंत अनेक मिम्स सोशल मिडिया मिडियावर व्हायरल झाले होते, त्यावर आज देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदावरून राज्यात जवळपास 12 दिवस खलबतं चालली. त्यानंतर अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव जाहीर झालं त्यानंतर काल (गुरूवारी) मुख्यमंत्री म्हणून फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. त्या निकालानंतर आणि मुख्यमंत्री पदासाठीचं नाव जाहीर होईपर्यंत सोशल मिडियावर महायुती सरकारच्या बाबतीतले अनेक रिल्स, मीम्स व्हायरल झाले होते. त्यामध्ये अजित पवार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीवर देखील काही मीम्स होते, तर शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवरतीही काही रिल्स सोशल मिडियावर फिरत होते, यावर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
सोशल मिडियावरील मीम्समध्ये असं दाखवण्यात येत होतं की, अजित पवार देवेंद्र फडणवीसांना म्हणतात की, सकाळी सकाळी शपथ घेऊन टाकू. एकनाथ शिदें मान्य करत नाहीत, तर आपण शपथ घेऊन टाकूयात. कारण आता संख्याबळ देखील जास्त आहे. असं काही प्रस्ताव आला होता का या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, असा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. मी पण हे मान्य करतो, खूप मजेदार मीम्स सोशल मिडियावर दिसले, त्यामुळे आमचं देखील चांगलंच मनोरंजन झालं. आम्ही देखील एकमेकांना हे मीम्स पाठवत होतो. आम्ही पण एकमेकांना या मीम्सबद्दल सांगत होतो, असं फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले.
त्याचवेळी सोशल मिडियावर एक मीम असं होतं, त्यामध्ये अजित पवार एका खुर्चीवर बसले होते, त्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री लिहलेलं होतं. आणि ते म्हणतात की, कोणालातरी बसवा मी तर उपमुख्यमंत्री म्हणून पर्मनंट आहे. असे खूप सारे मीम्स सोशल मिडियावर बनले, असं ते पुढे म्हणाले.
मी कोणत्याही माध्यमांना चुकीचं म्हणत नाही. पण ज्याप्रकारे माध्यमांमध्ये येत होतं एकनाथ शिंदे नाराज आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनू इच्छित नाहीत, अशी कोणती परिस्थिती नव्हती. ज्यावेळी मी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं, मी पण इच्छुक नव्हतो, पण माझ्या पक्षाने मला ती जबाबदारी दिली, तेव्हा माझ्या लक्षात आलं सरकार चालवायचा असेल तर पक्षाचा जो मजबूत व्यक्ती आहे, त्याला अधिकार असतो. तो व्यक्ती सरकारमध्ये असेल तर पक्षही व्यवस्थित चालतो. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीला मान्यता दिली आणि ते तयार झाले, असे पुढे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणाले.