आज विधानसभा निवडणुका झाल्यास मराठवाड्यात कुणाला किती जागा?; 48 पैकी किती मतदारसंघात महायुती? निकालानंतरचं अर्थमॅटीक
मराठवाड्यात लोकसभेच्या 8 जागा असून विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास 48 विधानसभा मतदारसंघ आहेत.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीसाठी (Mahayuti) धक्कादायक निकाल लागला. 45 पेक्षा जास्त जागांवर निवडून येण्याचा दावा करणाऱ्या भाजप महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे या 17 जागांपैकी मराठवाड्यात केवळ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीला जिंकता आली. तर, महाविकास आघाडीने मराठवाड्यातील (Marathwada) उर्वरीत सातही जागांवर विजय मिळवला आहे. त्यामध्ये, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि नांदेड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे खासदार विजयी झाले आहेत. तर, छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचे संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) निवडून आले आहेत. भुमरेंच्या विजयामुळे, मराठवाड्यात महायुतीचा एकमेव खासदार विजयी झाल्याचं दिसून येतं. आता, लोकसभा निवडणुकांतील आघाडीवरुन विधानसभेचा अंदाज बांधता येईल.
मराठवाड्यात लोकसभेच्या 8 जागा असून विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास 48 विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालांची आकडेवारी पाहिल्यास मराठवाड्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं पारडं जड आहे. मराठवाड्यात विधानसभेचे 48 मतदार संघ आहेत. लोकसभा निकालात या 48 मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांना किती मतदारसंघात लीड मिळाली, यावरुन विधानसभा निवडणुकांचा अंदाज बांधता येऊ शकतो. त्यानुसार, लोकसभा निवडणूक निकालात महाविकास आघाडीला मराठवाड्यातील 48 पैकी 34 विधानसभा मतदारसंघातून आघाडी आहे. तर, महायुतीला केवळ 12 मतदारसंघात आघाडी आहे. महायुतीच्या 12 पैकी 4 मतदारसंघातील आघाडी ही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातूनच आहे. विशेष म्हणजे एमआयएमलाही याच मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघात आघाडी आहे. त्यामुळे, उर्वरीत 7 लोकसभा मतदारसंघांच्या 42 जागांपैकी महायुतीला केवळ विधानसभेच्या 8 जागांवर आघाडी आहे.
मराठवाड्यातल 48 जागांपैकी किती विधानसभा मतदारसंघात कोणाला आघाडी
महाविकास आघाडी - 34
महायुती -12
एमआयएम -2
अशा रितीने महाविकास आघाडीला विधानसभेच्या 34 मतदारसंघात आघाडी मिळाली असून महायुतीला 12 मतदारसंघात आघाडी आहे. त्यामध्ये, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्वच 6 मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी दिसून येते.
औरंगाबाद लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभांपैकी 4 विधानसभा मतदारसंघात महायुतीला आघाडी आहे. तर, दोन विधानसभा मतदारसंघात एमआयएमने आघाडी घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, उर्वरीत सात लोकसभा मतदारसंघात महायुतीची चांगलीच पिछेहट झाल्याचं दिसून येतय.
महायुतीला 4 तर एमआयएमला 2 जागांवर आघाडी
(औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य ,औरंगाबाद पश्चिम,गंगापूर ,वैजापूर आणि कन्नड)
महायुती 4 मतदारसंघात आघाडी - (औरंगाबाद पश्चिम, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड)
मराठवाड्यातील 12 मतदारसंघात महायुतीला आघाडी
औरंगाबादमधील औरंगाबाद पश्चिम, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड
नांदेडमधील भोकर, मुखेड
बीडमधील माजलगाव, आष्टी, परळी,
परभणीतील गंगाखेड
हिंगोलीतील दोन मतदारसंघातून महायुतीला आघाडी आहे
लोकसभेतील निकालानुसार, महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी किती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी आहे, किती मतदारसंघात महायुतीला आघाडी आहे यावर एक नजर टाकुयात
विधानसभा मतदारसंघनिहाय आघाडी
एकूण जागा - 288
मॅजिक फिगर - 145
मविआ - 150 +
महायुती - 130 +
विदर्भ - एकूण जागा - 62
मविआ - 42
महायुती - 19
मराठवाडा - एकूण जागा- 48
मविआ - 34
महायुती - 12
एमआयएम- 02
मुंबई- 36
मविआ - 20
महायुती - 16
पश्चिम महाराष्ट्र - 59
मविआ - 33
महायुती - 26
उत्तर महाराष्ट्र - 48
मविआ - 19
महायुती - 29
कोकण- 12
मविआ - 5
महायुती - 7