गुजरातमध्ये ज्या मोरबी अपघातात 130 जणांनी जीव गमावला; त्या मतदारसंघाचा कल काय?
Gujarat Election Results 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये मोरबी दुर्घटनेनं खळबळ माजली होती. त्यानंतर प्रशासनावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात होते.
Morbi Assembly Results 2022: गुजरात विधानसभा (Gujarat Election) निवडणुकीत 182 विधानसभा जागांचे कल समोर आले आहेत. भाजपनं (BJP) मोठी आघाडी घेतली आहे. समोर आलेल्या कलांनुसार काँग्रेसचा (Congress) पराभव होत आहे. दरम्यान, मोरबी (Morbi) विधानसभेच्या जागांबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. मतमोजणीच्या कलांनुसार मोरबीमधून भाजपचे उमेदवार कांतिभाई अमृतिया आघाडीवर आहेत. या मतदारसंघातून जयंती पटेल काँग्रेसच्या उमेदवार असून आम आदमी पक्षानं (AAP) पंकज रंसरिया यांना उमेदवारी दिली आहे. कांतिभाई अमृतिया पुल दुर्घटनेनंतर चर्चेत होते. आमदार अमृतिया एका व्हायरल व्हिडीओमध्ये नदीत वाहून बचाव कार्यात मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.
गुजरातमध्ये 30 ऑक्टोबर रोजी मोरबी येथे मच्छू नदीवरील ओव्हरब्रिज कोसळल्यानं रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली होती. पूल कोसळल्यानं 500 हून अधिक लोक नदीत पडले होते. या अपघातात 130 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. पुलाची क्षमता केवळ 125 लोकांची होती, मात्र प्रशासकीय दुर्लक्षामुळे पुलावर एवढी गर्दी झाल्याचे तपासात समोर आलं आहे.
मोरबी पूल दुर्घटना प्रकरणाच्या चौकशीसाठी गुजरात सरकारनं पाच सदस्यांची समिती स्थापन केली होती. याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पुलाच्या केबल खराब झाल्यामुळं अपघात घडल्याचं तपासात समोर आलं होतं. दुरुस्तीदरम्यान पुलाला आधार देणार्या केबल्स बदलल्या असत्या तर ही दुर्घटना टाळता आली असती, असंही सांगण्यात आलं आहे.
मोरबीतील आकर्षणाचं केंद्र होता पूल
मोरबीतील मच्छू नदीवर बांधलेल्या हा झुलता पूल एक, दोन वर्ष नाही, तर तब्बल 140 वर्ष जुना होता. या पुलाचा इतिहास सुमारे 140 वर्षांचा होता. या पुलाबद्दल बोलायचं झालं तर ते गुजरातच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने लोक येत असतात. या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा झुलता पूल होता. ऋषिकेशमधील राम आणि लक्ष्मणाच्या झुल्यासारखाच हा पूल होता. त्यामुळे इथे मोठ्या संख्येनं लोक यायचे. रविवारी या पुलावर 500-700 लोक एकत्र जमल्यानं पुलाला भार सहन झाला नाही आणि पूल कोसळून नदीत पडला.
1880 मध्ये बांधण्यात आलेला पूल
मोरबी येथील मच्छू नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचं बांधकाम 1880 मध्ये पूर्ण झालेलं. त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बनवण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च झाले होते. या पुलाच्या बांधकामाचं सर्व साहित्य ब्रिटनमधून आलं होतं. बांधकाम झाल्यापासून ते दुर्घटनेपूर्वीपर्यंत या पुलाची अनेकवेळा डागडुजी करण्यात आली होती. या पुलाची लांबी 765 फूट होती. तर हा पूल 1.25 मीटर रुंद आणि 230 मीटर लांब होता. हा पूल भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचाही साक्षीदार आहे. हा भारतातील सर्वात जुन्या पुलांपैकी एक होता, त्यामुळे तो पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र होता. या पुलावर जाण्यासाठी 15 रुपयांचं शुल्क आकारलं जात होतं.