एक्स्प्लोर
Advertisement
घनसावंगी विधासभा मतदारसंघ : राजेश टोपेंच्या परंपरागत गडाला शिवसेनेचा सुरुंग!
घनसावंगी हा जालना जिल्ह्यातील एक मतदारसंघ. जालना जिल्ह्याचे नेते राजेश टोपे यांचा हा मतदारसंघ. मतदारसंघ फेररचनेनंतर आस्तित्वात येण्यापूर्वी अंबड तालुका हा टोपे पिता-पुत्रांचा बालेकिल्ला होता. पुनर्रचनेमध्ये अंबडऐवजी घनसावंगी हा मतदारसंघ तयार झाला. अर्थात घनसावंगीही टोपेंचा बालेकिल्ला आहे. पण शिवसेनेची तयारी कौतुकास्पद आहे.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यातील मतदारसंघ. हा मतदारसंघ 2009 च्या मतदारसंघ फेररचनेनंतर अस्तित्वात आला. या मतदारसंघाचा भाग फेररचनेपूर्वी अंबड विधानसभा मतदार संघात सामाविष्ट होता. पुनर्रचनेनंतर अंबड विधानसभा मतदारसंघाचे अस्तित्व संपलं. त्याऐवजी संपूर्ण घनसावंगी तालुका आणि अंबड आणि जालना तालुक्यातील काही गावांचा मिळून घनसावंगी हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. हा मतदारसंघ जालना जिल्ह्यात असला तरी लोकसभेसाठी तो परभणी लोकसभेच्या अंतर्गत येतो.
जालना शहरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत या मतदारसंघाचा विस्तार आहे.
घनसावंगी मतदारसंघ आस्तिवात येण्याअगोदरपासून म्हणजे 1999 पासून हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांचा बालेकिल्ला आहे. 1999 पासून ते आजवर सलग विजय मिळवत राजेश टोपे यांनी या मतदारसंघात एकछत्री अंमल प्रस्थापित केला आहे. राजेश टोपे घनसावंगीमध्ये सलग तीन वेळेस विजयी झाले. दोन सहकारी साखर कारखाने, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील जाळ्यामुळे राजेश टोपे यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. राजेश टोपे यांचे वडील स्व.अंकुशराव टोपे हेही 1972 मध्ये काँग्रेस उमेदवार अण्णासाहेब उढाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून विधानसभेवर निवडून आले होते. 1991 ला अंकुशराव टोपे हे काँग्रेसच्या तिकिटावर जालना लोकसभा निवडणूक लढवून विजयी झाले आणि तेव्हा पासून टोपे पिता-पुत्रांची जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड बसली.
घनसावंगी मतदार संघात टोपेंच्या साम्राज्याला हादरा देण्याचा प्रयत्न 2009 साली झाला. विद्यमान राज्यमंत्री शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि राजेश टोपे यांच्यात त्या काळी निवडणुकीचा मोठा रणांग्राम झाला. यात खोतकरांचा 23 हजार 307 मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर टोपेंचा गड अभेद्य आहे, असा प्रचार या मतदारसंघात झाला.
या मतदार संघात 2014 च्या निवडणुकीत राजेश टोपे यांच्या विरोधात शिवसेनेकडून डॉ. हिकमत उढाण यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून माजी आमदार विलास खरात यांना उमेदवारी देण्यात आली. 2014 च्या तिहेरी लढतीत भाजप शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा घेत राजेश टोपेंचा पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.
2014 घनसावंगी विधानसभा उमेदवार आणि मते :
राजेश टोपे (राष्ट्रवादी) : 98030
विलास खरात(भाजप) : 54554
डॉ. हिकमत उढाण (शिवसेना) : 45657
शिवसेना-भाजपच्या परंपरागत जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, तर आघाडीत राष्ट्रवादीचा. 2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे स्वतंत्र निवडणूक लढवल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत झाली. 2014 ला या मतदारसंघातून भाजप दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेनेचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. असं असलं तरी खऱ्या अर्थाने गेली पाच वर्ष शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण जोरदार तयारी करत आहेत. 2014 चा पराभव पचवत पुढच्या काही दिवसातच त्यांच्या मतदारसंघातील दौऱ्याचे अनेकांना कुतूहल वाटले. साहजिकच गेल्या पाच वर्षात मतदार संघ हिकमत उढाण यांच्या नेतृत्वाखाली ढवळून निघाला आहे. मधल्या काळात शिवसेनेतील अंतर्गत कलह उढाण यांच्या नेतृत्वामुळे संपुष्टात आला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश टोपे यांचा कस लागणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभेवर निवडून आलेले शिवसेना उमेदवार खासदार संजय जाधव यांना घनसावंगी विधानसभा मतदार संघातून 24 हजार 282 एवढं मताधिक्य मिळालं. यात शिवसेनेच्या डॉ. हिकमत उढाण यांच्या व्यूहरचनेचा आणि स्थानिक पक्षीय बांधणीचा मोठा हात होता. लोकसभेचे गणित विधानसभेला उपयोगी पडतंच असं नाही. पण लोकसभेच्या निकालामुळे घनसावंगी मतदारसंघातील शिवसैनिकांचा आत्मविश्वास मात्र वाढलाय.
राजेश टोपे यांचा मतदारसंघात गावपातळीपर्यंत प्रत्यक्ष संपर्क आहे. समर्थ सहकारी साखर कारखाना आणि त्याचाच एक भाग असलेला सागर सहकारी साखर कारखाना यामुळे मतदारसंघातील प्रत्येक गावात राजेश टोपे यांचा सातत्याने संपर्क असतो. या व्यतिरिक्त यशवंत सहकारी सूतगिरणी, समर्थ सहकारी बँक, मत्स्योदरी शिक्षण संस्था इत्यादीमुळे राजेश टोपे मतदारांच्या संपर्कात असतात. घनसावंगी पंचायत समिती, स्थानिक नगर पंचायत राजेश टोपे यांच्या अधिपत्याखाली आहे. घनसावंगी मतदार संघात शिवसेनेची स्पर्धा असली तरी जालना जिल्हा परिषदेत मात्र राजेश टोपे यांच्या राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत युती आहे. राजेश टोपे यांचे बंधू जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंधू अनिरुद्ध खोतकर अध्यक्ष आहेत.
शिवसेनेच्या तुलनतेत राष्ट्रवादीची पक्षीय ताकत जास्त असली तरी, डॉ हिकमत उढाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची नव्याने बांधणी झालीय. मतदारसंघातील पायाभूत सुविधा आणि विकासाच्या प्रश्नावरून टोपेंच्या विरोधात मतप्रवाह बनवण्यात शिवसेनेला बऱ्यापैकी यश आलंय. याच विरोधी मतप्रवाहाचे एक उदाहरण लोकसभेतील मताधिक्याच्या स्वरूपात पाहायला मिळालं.
टोपे यांच्यासमोर वंचितचे तर उढाण यांच्या समोर युतीधर्माचे आव्हान
या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार कोण असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु कोणीही उमेदवार असला तरी त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल असंच चित्र मतदारसंघात आहे. वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी सर्वाधिक इच्छुक याच मतदारसंघात आहेत. या मतदारसंघातील मतदार विविध जातीमध्ये विभागलेला आहे. इतर मागास आणि दलित, मुस्लिम मतांची संख्या पाहता वंचित आघाडीचा फटका टोपेंच्या परंपरागत मतांना बसणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचा फटका कमीत कमी कसा बसेल याचा राष्ट्रवादी प्रयत्न करेल, तर दुसरीकडे शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराचा विजय बहुजन वंचित आघाडी किती मते घेणार यावरही अवलंबून असेल.
मागील निवडणुकीत भाजप शिवसेना वेगळी लढल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. मात्र यावेळी युती झाल्यानंतर शिवसेनेसाठी ही निवडणूक त्या तुलनेत अधिक सुकर होईल, पण असं असलं तरी भाजपच्या मदतीचे आणि स्थानिक नेत्यांचे निवडणूक काळातील मतैक्य महत्वाचे ठरणार आहे. यासाठी निवडणूक काळात शिवसेनेचे उमेदवार डॉ हिकमत उढाण यांचा कस लागणार आहे.
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न :
घनसावंगी मतदारसंघात माजी मंत्री राजेश टोपे यांनी 1999 पासून आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे. ते तब्बल चौदा वर्षे राज्यात नगरविकास, उच्च व तंत्र शिक्षण, ऊर्जा अशा महत्वाच्या खात्यांचे मंत्री होते. या काळात जनतेला अपेक्षित अशा विकासकामांची गती टोपे यांना गाठता आली नाही. साहजिकच मतदारसंघात रस्ते, आरोग्य, वीज आणि सिंचनाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळेच राजेश टोपे यांच्या विरोधात मतप्रवाह बनवण्यासाठी शिवसेनेला अनुकूल वातावरण मिळालं आहे.
एकूणच मतदारसंघातील वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. सध्याच्या स्थितीत युती आणि वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातील निर्णय होणं बाकी आहे आहे. अशा स्थितीत टोपे आणि उढाण लढाईत आणखी कुठल्या उमेदवारांची भर पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र यामुळे घनसावंगीच्या लढतीचा रणसंग्राम आणखी चुरशीचा होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement