Gadchiroli : गडचिरोलीत 111 वर्षांच्या आजीने केले उत्साहात मतदान; फुले उधळली, शाल-श्रीफळ देऊन केला सत्कार
Gadchiroli Voting News : 111 वर्षांच्या फुलमती विनोद सरकार या आजी मतदानासाठी आल्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर प्रशासनानेही त्यांचा सत्कार केला.
गडचिरोली : राज्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन एकीकडे सेलिब्रेटींच्या माध्यमातून केलं जात असताना दुसरीकडे गडचिरोलीमध्ये 111 वर्षांच्या आजीने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यावेळी शालेय विद्यार्थ्यांकडून आजीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर प्रशासनाकडून आजींचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी 7 वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत गडचिरोलीमध्ये 63 टक्के मतदान झालं.
लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील 111 वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. फुलमती बिनोद सरकार असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म 1 जानेवारी 1913 रोजी झाला.
प्रशासनाकडून शाल-श्रीफळ देऊन सत्कार
फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यांनतर शालेय विद्यार्थी,गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात स्वागत केले. त्यांनतर आजीने उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.
प्रशासनाच्या वतीने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती बिनोद सरकार यांना शॉल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी मुलचेराचे गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे, पुरवठा अधिकारी इंगोले, तलाठी रितेश चिंदमवार, ग्रामपंचायतचे सचिव अक्षय कुळमेथे तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते.
ही बातमी वाचा :