मुंबईत चार कोटींची रोकड जप्त, निवडणूक भरारी पथकाची कारवाई
चार कोटींची रक्कम कोणत्याही सुरक्षेशिवाय, एकही अधिकारी सोबत नसताना खासगी गाडीतून नेली जात होती, त्यामुळे संशय निर्माण झाला आहे. याबाबत तपास अधिकारी अधिकारी अधिक तपास करत आहेत.
मुंबई : मुंबईत शनिवारी सायंकाळी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. वरळी सी-लिंकवरील चेकपोस्टजवळ ही रोकड जप्त करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील जावळी येथील दत्तात्रय महाराज कळंबे पतसंस्थेची ही रोकड असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली.
मात्र चार कोटींची रक्कम कोणत्याही सुरक्षेशिवाय, एकही अधिकारी सोबत नसताना खासगी गाडीतून नेली जात होती, त्यामुळे संशय निर्माण झाला आहे. माहिती निवडणूक आयोगाच्या तपासी अधिकारी सुषमा सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जप्त केलेल्या काही रक्कमेबाबत पतसंस्थेचे कर्मचारी स्पष्ट उत्तर देऊ न शकल्याने हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपवण्यात आलं आहे. मला या प्रकरणी फसवलं जात असून गाडीत एवढी मोठी रक्कम आहे, याची मला माहिती नव्हती, असं ड्रायव्हरने म्हटलं आहे.
दरम्यान आत्तापर्यंत आचारसंहिता काळात 511 शस्त्रे, आठ कोटींहून अधिकची रोकड, 16 लाखांचे अमलीपदार्थ, 10 लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 34 गुन्हे दाखल झाले आहेत.