ब्राह्मण समाजाविषयी वादग्रस्त विधान, राजू शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
राजू शेट्टी यांना नोटीस बजावल्यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांचा खुलासा अपेक्षित होता. रात्री उशिरापर्यंत राजू शेट्टी यांनी नोटीसला उत्तर दिले नाही. यामुळे अखेर राजू शेट्टी यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत राजू शेट्टी यांच्याविरोधात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा भंग आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 125 अन्वये राजू शेट्टींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथक क्रमांक- 3 चे प्रमुख मेघराज घोडके यांनी याबाबतची फिर्याद दिली होती.
हातकणंगले येथील हेरलेमधील ग्रामपंचायतीसमोर 2 एप्रिलला झालेल्या सभेत शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. ‘सीमेवर आमची पोरं जातात, देशपांडे-कुलकर्ण्यांची नाही. कुलकर्णी, देशपांडे, जोशी आडनावाच्या व्यक्ती सैन्यात कधीच भरती होत नाहीत. शेतकर्यांचीच मुले सैन्यात असतात’, असं वक्तव्य त्यांनी केलं होते.
राजू शेट्टींच्या या वक्तव्याबद्दल विविध संघटनांनी शेट्टी यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. अनेक संघटनांनी निवडणूक आयोग तसेच निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी शेट्टी यांना शुक्रवारी नोटीस बजावली. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवर आपला खुलासा 24 तासांत सादर करावा, असेही या नोटीसमध्ये स्पष्ट केले होते.
राजू शेट्टी यांना नोटीस बजावल्यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांचा खुलासा अपेक्षित होता. रात्री उशिरापर्यंत राजू शेट्टी यांनी नोटीसला उत्तर दिले नाही. यामुळे अखेर राजू शेट्टी यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अन्वये गुन्हा नोंद करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांनी दिले. त्यानुसार हातकणंगले पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला.
राजू शेट्टी यांच्या या वक्तव्यामुळे मतदारसंघातील ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ब्राह्मण व ब्राह्मणेतर समाजांमध्ये दरी निर्माण झाली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. जिल्ह्यात या निवडणुकीत उमेदवारावर प्रथमच अशाप्रकारे गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
VIDEO | ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह विधानानंतर खासदार राजू शेट्टींचा माफीनामा | कोल्हापूर | एबीपी माझा