Election Result 2022 : कुठे काय झालं, वाचा आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या 10 घडामोडी...
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत आहेत. आत्तापर्यंत पंजाब वगळता अन्य ठिकाणी भाजप आघाडीवर आहे.
Election Result 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू हाती येऊ लागले आहेत. अद्याप पूर्ण चित्र स्पष्ट झाले नसले तरी मतदारांनी कल कोणाच्या बाजून दिले आहेत, ते स्पष्ट झाले आहे. पंजाब वगळता अन्य चार राज्यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्याठिकाणी आम आदमी पार्टीने मोठी मुसंडी ठिकाणी मारली आहे. जवळपास 80 च्या आसपास जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. आत्तापर्यंत या पाच राज्यात नेमकं कुठे काय झालं? पाहुयात आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या दहा घडामोडी....
आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या 10 घडामोडी
पंजाबमध्ये आपचा करिष्मा
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने चांगलीच मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. आपने पंजामध्ये 80 च्या आसपास जागांवर आघाडी घेतली आहे. त्या ठिकाणी काँग्रेसला हादरा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ 18 जागांवर काँग्रेस पंजाबमध्ये आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आप पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
उत्पल पर्रिकरांचा पराभव
सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे गोव्यातील आहे. गोव्यातून पणजी विधानसभा मतदारसंघातून गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांचा पराभव भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी केला आहे. उत्पल पर्रिकर यांचा 800 मतांनी पराभव झाला आहे. उत्पल पर्रिकर हे भाजपचे बंडखोर उमेदाव होते.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपची आघाडी
अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. कारण जवळपास 250 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर समाजवादी पार्टी पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. समाजवादी पार्टी 110 जागांवर आघाडीवर असून, इतर पक्षांचे उमेदवार हे 13 जागांवर आघाडीवर आहेत.
पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसला धक्का
गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. हा काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जातोय. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. रायबरेली मतदारसंघात नुकत्याच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आदिती सिंह 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपच
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. यामध्ये 44 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेचा फ्लॉप शो
महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचा निर्धार करणाऱ्या शिवसेनेचा अद्याप एकही उमेदवार निवडून आलेला नाही. शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवत आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर फ्लॉप शो कायम असल्याची चर्चा आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय
गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला आहे. काही वेळ प्रमोद सावंत हे पिछाडीवर गेले होते. मात्र, अखेर ते 500 मतांनी विजयी झाले आहेत. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांचा पराभव केला आहे.
मणिपूरमध्येही भाजपची आघाडी
2022 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे एक्झीट पोलमध्ये सांगण्यात आले होते. मात्र, मणिपूरमध्ये भाजपची बहुमताच्या दिशेनं वाटचल सुरु आहे. मणिपूरमध्ये भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर आहे. इतर अमेदवार 14 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये देखील पुन्हा भाजपचं सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
गोव्यात भाजप बहुमताच्या दिशेनं
गोव्यात यावेळी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला अन्य पक्षाची मदत घ्यावी लागणार नसल्याचे वातावरण तार झाले आहे. कारण सध्या भाजप 19 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. पुन्हा गोव्यात भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे.
1993 नंतर बसपाची सर्वांत वाईट कामगिरी
उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातींच्या समुदायाच्या आधारे बहुजनांचे राजकारण करणाऱ्या बहुजन समाज पक्षाची कामगिरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अतिशय वाईट राहिली. सध्याच्या कलानुसार बसपाला उत्तर प्रदेशात दोन अंकी जागादेखील गाठता आली नाही. बसपाची आतापर्यंतची ही वाईट कामगिरी आहे. हाती आलेल्या कलानुसार बसपा केवळ पाच जागांवर आघाडीवर आहे. 2017 च्या निवडणुकीत बसपाला 19 जागांवर विजय मिळवता आला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
- Punjab Election Result 2022 Live : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकाल एका क्लिकवर...
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा