साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, तीन दिवस प्रचारबंदी
आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
भोपाळ : बाबरी मशिदीबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचारबंदीची कारवाई केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर 72 तास म्हणजे तीन दिवस प्रचार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या कारवाईची अमंलबाजावणी गुरुवारी सकाळी 6 वाजल्यापासून सुरु होणार आहे. या काळात त्या कोणत्याही प्रचारसभा घेऊ शकणार नाहीत, तसेच सभेत सहभागी होऊ शकणार नाहीत. यादरम्यान कोणतीही मुलाखत किंवा प्रतिक्रियाही देऊ शकणार नाहीत. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
काय बोलल्या होत्या प्रज्ञासिंह ठाकूर?
प्रज्ञा सिंह ठाकूर एका टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात त्या बोलल्या की, "मी बाबरी मशीद पाडायला गेले होते, आम्ही मिळून मशिदीचा ढाचा पाडला आणि आता मंदिर बांधायलादेखील जाणार आहे. मी पूर्ण आत्मविश्वासाने बोलत आहे, कारण प्रभू श्रीराम माझे आदर्श आहेत. त्यांच्यावर माझी भक्ती आहे. राम राष्ट्र आहे, राष्ट्रही राम आहे, त्यामुळे भव्य राम मंदिर बनवण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही."
शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबतही वादग्रस्त केलं होतं. "हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला." याप्रकरणी साध्वींना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. जनतेच्या संतापानंतर साध्वींना याबद्दल माफीही मागावी लागली होती.
VIDEO | साध्वीचं वक्तव्य हा शहीदांचा अपमान नाही का? | माझा विशेष