(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde Daregaon: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; डॉक्टरांची टीम पुन्हा तपासणीसाठी दाखल, दरेगावात काय घडतंय?
Devendra Fadnavis phone called Eknath Shinde: एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून दरेगावी मुक्कामी आहेत.
Eknath Shinde Daregaon: देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Devendra Fadnavis phone called Eknath Shinde) यांना आज फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात गेल्यानंतर ते आजारी पडले. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) फोन करुन त्यांची विचारणा केली. दरम्यान, एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून दरेगावी मुक्कामी असून आज ते ठाण्यासाठी रवाना होणार आहेत, अशीही माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार-
एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. परंतु ते आजारी पडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी काल विश्रांती घेतली आणि त्यांची तब्येत काही प्रमाणात बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे आज दुपारी ते मुंबईला परतण्याची शक्यता आहे.
भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार-
महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. तर, दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी, भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी 1 वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
शपथविधीला एअर ॲम्बुलन्समधून त्यांना यावं लागेल- संजय राऊत
ते आजारी आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काही वेड वाकडं बोलू नका त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. हाताला पट्टी लावून बसले आहेत. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले त्या मंत्र्यांना देखील ते भेटले नाहीत. म्हणजे किती तब्येत त्यांची खराब आहे बघा..., असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. शपथविधीला एअर ॲम्बुलन्समधून त्यांना यावं लागेल अशा चिंतेत अनेक लोक आहेत. त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असे मी वृत्तपत्रात वाचलं. त्यांना डॉक्टर यांची गरज आहे का? मांत्रिक यांची गरज आहे हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदी पाठवत आहेत?, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.