Eknath Shinde Daregaon: दीपक केसरकर दरेगावात एकनाथ शिंदेंना भेटायला गेले; गेटवरुनच माघारी परतले, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Daregaon: ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचे विविध चर्चांना देखील उधाण आले आहे.
Eknath Shinde: राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Daregaon) हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे यांच्या शरीराचे तापमान हे 105° असून नुकतेच त्यांना सलाईन लावण्यात आली होती. प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे काल घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचे विविध चर्चांना देखील उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्रिपदाचा मान कोणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते तेच नाराज एकनाथ शिंदेंनी थेट गाव गाठलं आहे. ऐन अमावस्येला एकनाथ शिंदे गावी गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावाला निघून गेले. त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. तसेच बहुमत मिळूनही लोक राजभवनला जाण्याऐवजी अमावस्येच्या दिवशी गावाला का जातात?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगवाला.
दीपक केसरकर माघारी गेले...
शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला काल त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने दीपक केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. त्यानंतर दीपक केसरकर मुंबईकडे रवाना झाले.
दरेगावमधील एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय संजय मोरे काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाही, त्यामुळे ते आराम करण्यासाठी आले आहेत. त्यांच्या पत्नी देखील त्यांच्यासोबत आहेत. काही लोक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांना बरं नसल्याने त्यांना परत पाठवलं जात आहे, असं दरेगावमधील एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय संजय मोरे यांनी सांगितले. जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील आणि दिपक केसरकर शिंदेना भेटण्यासाठी आले होते, मात्र त्यांना भेटण्यास नकार दिलाय, असंही संजय मोरे म्हणाले.