सोलापुरात दिलीप मानेंची माघार, पण धर्मराज काडादी लढणार; सुभाष देशमुखांविरुद्ध सांगली पॅटर्न?
दिलीप माने यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचे उपरणे, टोप्या आणि लोगो रागाच्या भरात जमिनीवर टाकून दिल्याचं पाहायला मिळालं
सोलापूर : उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेत पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे, जवळपास राज्यातील 288 मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून काही मतदारसंघात बंडखोरी कायम आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केल्यास सांगोला आणि पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने व तेथील उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्याने येथे मविआमधीलच उमेदवारांची लढत रंगणार आहे. दुसरीकडे सोलापूर दक्षिण मतदारसंघात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. सोलापूर दक्षिणमध्ये दिलीप माने (Dilip Mane) हेच काँग्रेसचे उमेदवार असतील असं सांगून देखील काँग्रेसनं (Congress) त्यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे, दिलीप मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी दिलीप माने व त्यांच्या मुलाने अर्ज माघारी घेतले आहेत.
दिलीप माने यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचे उपरणे, टोप्या आणि लोगो रागाच्या भरात जमिनीवर टाकून दिल्याचं पाहायला मिळालं. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या बाहेर सर्व प्रचार साहित्य रस्त्यावर फेकण्यात आले होते. प्रणिती शिंदे आणि काँग्रेसने मोठा दगफटका केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दिलीप माने यांना काँग्रेसनं उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसची उमेदवारी दिलीप माने यांनाचं मिळेल असं आश्वासनं देखील दिलं होते. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत दिलीप माने यांना काँग्रेसचा एबी फॉर्म काही मिळाला नाही. त्यामुळे माने यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला होता. दिलीप माने यांच्यासह त्यांच्या मुलानेही अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्यादिवशी दिलीप मानेंसह त्यांच्या मुलानेही अर्ज माघारी घेतला आहे.
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दिलीप माने आणि त्यांच्या मुलगा पृथ्वीराज माने दोघांचे अर्ज माघारी घेतले आहेत. मात्र, काँग्रेसचे दुसरे बंडखोर धर्मराज काडादी यांचा अर्ज अद्यापही कायम आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, धर्मराज काडादी अपक्ष आहेत. या दोन्ही नेत्यांना माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे आव्हान असणार आहे.
सोलापूर शहर उत्तरमधून शोभा बनशेट्टींची बंडखोरी कायम
सोलापूर शहर उत्तरमधून भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांची बंडखोरी कायम आहे. भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर शोभा बनशेट्टी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शोभा बनशेट्टी या भाजपच्या माजी महापौर असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. शोभा बनशेट्टी यांनी विरोधात उमेदवारी कायम ठेवल्याने आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढल्याचं दिसून येतं.
धाराशिव जिल्ह्यातील शिंदे गटाच्या बंडखोरांची माघार
धाराशिव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, जिल्हा संघटक सुधीर पाटील व कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे या तिघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माघार घेतल्याची माहिती आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यात थेट लढत होणार आहे.
परंड्यात ठाकरेंच्या उमेदवाराची माघार
परंडा विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाच्या रणजीत पाटल यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीतील तिढा सुटला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहुल मोटे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या रणजीत पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र, रणजीत पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे. परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांच्यात थेट लढत होणार आहे.
हेही वाचा
वडिल बबन घोलपांनी नोटीस बजावताच मुलीकडून अर्ज मागे; देवळाली मतदारसंघात ट्विस्ट, कौटुंबिक कलह टळला