Dhananjay Munde: 'परळीतील कधी नव्हे ते 30 वर्षांनी लागलं गालबोट...', धनंजय मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवारांवर गंभीर आरोप, कारवाईची मागणी
Dhananjay Munde: परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये कधी नव्हे ते गालबोट या निवडणुकीला लागले असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्याकडून दहशत पसरवण्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
परळी: महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. काही मतदारसंघामध्ये तगडी लढत होणार आहे. काही मतदारसंघामध्ये गोंधळ होताना दिसत आहेत, काही ठिकाणी पक्षातील कार्यकर्ते आपापसांमध्ये भिडताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि त्यांच्या मुलाने मतदार संघामध्ये दहशत निर्माण केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये कधी नव्हे ते गालबोट या निवडणुकीला लागले असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्याकडून दहशत पसरवण्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
घाटनांदुर मुरंबी तसेच चोथेवाडी या ठिकाणी मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बन्सी शिरसाट यांनाही मारहाण केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली आहे. या घटनांनंतर मतदारसंघातील पोलीस यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आहे. घाटनांदुर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मतदारसंघात भेटी देत पाहणी करत आहेत, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
काय म्हणालेत धनंजय मुंडे?
दादागिरीची आणि दहशतीची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार करत आहेत. आज त्यांच्या चिरंजीव घाटनांदुरचे दोन बूथ फोडले, अनेक ठिकाणच्या मशीन फोडल्या. त्याचबरोबर इतर ठिकाणच्या मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. बन्सी शिरसाट यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांची गाडी फोडली. त्यांच्यावर हल्ला करणारे हे उमेदवार आणि त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी चिन्हाचे आहेत. त्यामुळे दहशत कोणाची हे परळीच्या मायबाप जनतेला कळालं पाहिजे आजपर्यंत अशा प्रकारची घटना आणि गालबोट कधीच कुठे लागलं नाही.
गेल्या 30 वर्षाच्या निवडणुकीत अशा कोणत्याही प्रकारचा गालबोट आणि मशीन फोडण्याचा प्रकार झाला नव्हता. या घटनेतून या मतदारसंघांमध्ये कोणाला दहशत माजवायची आहे. त्यांची मानसिकता नागरिकांना दिसून येत आहे. मी याबाबत प्रशासनाला कारवाई करण्यासाठी विनंती केली आहे. मशीन फोडल्यानंतर नवीन मशीन बसवण्यापर्यंत जो वेळ वाया जातो आहे. तो वेळ पुढेही दिला पाहिजे. तात्काळ ज्याने कोणी हे केलं आहे, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. त्या बूथवरती असणारे कॅमेरे त्यातील व्हिडिओ फुटेज समोर आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा मुलगा प्रत्येक ठिकाणी जाऊन बूथ फोडत आहेत. यावर प्रशासन आणि निवडणूक आयोग काय कारवाई करते. हे मी पाहतो. मी त्यांच्याकडे तक्रार केलेलू आहे. जे हे करत आहेत ते कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत, फुटेजमध्ये दिसत आहेत. अनेक लोकांनी देखील त्यांना पाहिलं आहे. त्यांनी हे कोणत्या मानसिकतेतून केलं आहे. तेही दिसून येत आहे. याबाबत फोनवरून तक्रार केली आहे.