Devendra Fadnavis: मुख्यमंत्रीपदी फडणवीसच! विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने झाली निवड; शपथविधीचा काऊंटडाऊन सुरू
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला, त्याला पक्षातील आणि कमिटीतील अन्य नेत्यांनी आणि आमदारांनी एकमताने अनुमोदन दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 12 दिवस झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच आज अखेर सुटल्याचं चित्र आहे. महायुतीतील भाजपने आज मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव जाहीर झालं आहे. आज भाजपने अखेर मुख्यमंत्री पदाचं आणि विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे आता शपथविधीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे.आज पार पडलेल्या विधीमंडळाच्या गटनेता पदी देवेंद्र फडणवीसांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. उद्या (गुरूवारी) 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहतील.
बैठकीमध्ये काय घडलं?
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीला राज्यात 237 इतक्या जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 132 जागा जिंकल्या आहेत. महायुतीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडण्यात आला नव्हता. आज भाजपकडून आज विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्त्वाची बैठक विधीमंडळात पार पडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला, त्याला पक्षातील आणि कमिटीतील अन्य नेत्यांनी आणि आमदारांनी एकमताने अनुमोदन दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
सत्तास्थापनेची जोरदार तयारी सुरू
भाजपच्या या बैठकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. त्यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नाव घेत गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. याला पंकजा मुंडे, आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांनी अनुमोदन दिलं आणि फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आता अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी निवड झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आज राज्यापालांना सत्ता स्थापनेचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राज्यापालांना सत्ता स्थापनेचं पत्र देताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार सोबत जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी हे देखील राजभवनावर शिष्टमंडळासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळा
आज एकमताने भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. यानंतर उद्या (गुरुवारी) मुंबईतील आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024
महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष
जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)
भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137