Devendra Fadnavis : केजरीवालांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा फाडला, दिल्लीतील विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis On Delhi Election Result : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेतही दिल्लीकरांनी भाजपवर विश्वास दाखवला असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबई : अण्णा हजारे यांचा हात पकडून पुढे आलेल्या केजरीवाल यांनी नंतर भ्रष्टाचाराची साथ दिली. त्यांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा आता दिल्लीकरांनी फाडल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दिल्लीतील मराठी माणूस हा मोदींच्या मागे उभारल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. दिल्लीमध्ये 27 वर्षांनी भाजपने सत्ता मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या जनतेचं अभिनंदन केलं. हा नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास असल्याचं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "केजरीवाल यांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा फाटला आहे. सातत्याने खोटी आश्वासनं देत त्यांनी राज्य केलं, त्याचा अंत झाला. दिल्लीतील जनता लोकसभेत मोदींवर विश्वास दाखवायची. आता विधानसभेतही मोठा विजय मिळाला आहे. हे विकासाला दिलेलं मत आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार लोकांचे आशा आणि आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करणार. दिल्लीतील जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी भाजप प्रयत्न करणार.
दिल्लीतील मराठी माणूस मोदींच्या मागे
दिल्लीतील मराठी माणूस हा मोदींच्या मागे उभा राहिला याचा अभिमान आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'एक है तो सेफ है' हा नारा दिल्लीमध्येही चालला आहे. हा नारा आता देशाने स्वीकारला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
काँग्रेसला पराभव होणार हे माहिती होतं
दिल्लीमध्ये काँग्रेसला काही मिळणार नाही हे राहुल गांधी यांना आधीच माहिती होतं. त्यामुळे हारल्यानंतर काय बोलायचं याची कारणं त्यांनी आधीच ठरवली होती असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दिल्ली के दिल में बसा कमल! 🪷
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 8, 2025
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में एवं भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा जी के मार्गदर्शन में, दिल्ली में भाजपा की प्रचंड व अभूतपूर्व जीत के लिए प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा जी एवं सभी कार्यकर्ताओं को बधाई और मतदाताओं का आभार!… pic.twitter.com/KpKJXYgARk
दिल्लीत भाजपचा मोठा विजय
दिल्लीच्या निवडणुकीत तब्बल 27 वर्षांनंतर जोरदार कमबॅक करत भाजपनं आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवला. 70 पैकी तब्बल 48 जागांवर विजय मिळवत भाजपनं दिल्ली काबीज केली. भाजपच्या तडाख्यात आपच्या दिग्गजांचाही पराभव झाला.
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या परवेश वर्मांनी तब्बल चार हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसला. आम आदमी पार्टीला गेल्यावेळच्या तुलनेत तब्बल 40 जागांचा फटका बसला. गेल्यावेळी 70 पैकी तब्बल 62 जागा मिळवणाऱ्या आपला यावेळी 25 चा आकडाही ओलांडता आला नाही. काँग्रेसनं मात्र शून्याची हॅट्रिक केल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

