Anna Hazare VIDEO : एवढं प्रेम केलं तुमच्यावरती... केजरीवालांच्या पराभवानंतर अण्णा हजारे रडले
Anna Hazare On Arvind Kejriwal : दिल्लीतील मतदानाच्या दिवशी अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना स्वार्थी म्हणत त्यांच्यावर टीका केली होती.

अहमदनगर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाचा आणि अरविंद केजरीवाल यांचा मोठा पराभव झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भावनिक झाल्याचं दिसून आलं. एवढं प्रेम केलं तुमच्यावर, पण तुम्ही रस्ता सोडून गेला. त्यामुळेच नाईलाजाने तुमच्याविरोधात बोलावं लागलं अशी प्रतिक्रिया देताना अण्णा हजारेंच्या डोळ्यातून पाणी आल्याचं दिसून आलं.
या आधीही अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. ऐन निवडणुकीच्या दिवशी अण्णा हजारे यांनी केजरीवाल हे स्वार्थी असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांच्या पक्षाला मतदान करू नये असंही त्यांनी म्हटलं होतं. दिल्लीकरांनी आपला नाकारलं असून स्वतः अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
एवढं प्रेम केलं तुमच्यावरती
अण्णा हजारे म्हणाले की, "हीच आम्ही अपेक्षा ठेवली होती तुमच्याकडून, नाईलाजास्तव आम्हाला बोलावं लागलं. एवढं प्रेम केलं तुमच्यावरती. तुम्ही रस्ता सोडून गेलात म्हणून नाईलाजास्तव बोलावं लागलं."
अरविंद केजरीवाल यांना अनेक गोष्टी शिकवल्या. मात्र त्यांनी समाजाचा विचार केला नाही आणि राजकारणात गेले असे सांगत असताना झाले अण्णा हजारे भावुक झाल्याचं दिसून आलं.
अरविंद केजरीवाल यांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही म्हणूनच त्यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिली आहे. सत्ता, पैसा, दारूची दुकानं डोक्यात गेल्यामुळेच केजरीवाल यांचा पराभव झाला अशी टीका अण्णांनी केली.
अण्णा हजारे म्हणाले की, "अरविंद केजरीवाल यांनी ज्यावेळेस राजकारणात जायचा निर्णय घेतला आणि पक्ष काढला त्यावेळेस पासून मी त्यांच्याशी बोलणे बंद केले. पक्ष काढल्यानंतर मी परत त्यांच्याशी कधीही बोललो नाही. त्या दिवसापासून मी संबंध तोडून टाकले. कारण माझ्यापुढे पक्ष विरहित समाजसेवा, देशहित हेचं प्रधान्य होतं आणि आम्हाला तेच हवं आहे."
दिल्लीत 27 वर्षांनी भाजपचं कमबॅक
दिल्लीच्या निवडणुकीत तब्बल 27 वर्षांनंतर जोरदार कमबॅक करत भाजपनं आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवला. 70 पैकी तब्बल 48 जागांवर विजय मिळवत भाजपनं दिल्ली काबीज केली. भाजपच्या तडाख्यात आपच्या दिग्गजांचाही पराभव झाला.
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या परवेश वर्मांनी तब्बल चार हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसला. आम आदमी पार्टीला गेल्यावेळच्या तुलनेत तब्बल 40 जागांचा फटका बसला. गेल्यावेळी 70 पैकी तब्बल 62 जागा मिळवणाऱ्या आपला यावेळी 25 चा आकडाही ओलांडता आला नाही. काँग्रेसनं मात्र शून्याची हॅट्रिक केल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

