Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis: छगन भुजबळांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीस तोडगा काढणार; 40 मिनिटांच्या बैठकीत नेमकं काय काय घडलं?
Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis: राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं.
Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis: छगन भुजबळ (Chhagan Bhujal) यांना मंत्रिमंडळातून डावल्यानंतर ते दररोज उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. छगन भुजबळांकडून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल सुरु आहे. त्यानंतर आज छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मुंबईतील सागर बंगल्यावर जाऊन छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांनी माध्यामांशी संवाद साधला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मी आणि समीर भुजबळ आम्ही भेट घेतली. निवडणुकीत आपल्याला महाविजय जो मिळाला आहे. त्यात ओबीसीचे पाठबळ जे लाभलं त्याबद्दल आभार मानले. तसेच ओबीसींचे नुकसान होणार नाही. याची मला देखील खूप काळजी आहे, असं देवेंद्र फडणवीस बैठकीत म्हणाल्याची माहिती, असं छगन भुजबळांनी दिली.
8-10 दिवासांत मार्ग काढू; देवेंद्र फडणवीसांचा आश्वासन
छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. देवेंद्र फडणवीसांनी माझं सर्व ऐकून घेतलं. यामध्ये मला 8 ते 10 दिवसांचा वेळ द्या...आपण 8-10 दिवसांत शांततेने मार्ग काढू, असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यान राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली.. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
अजित पवारांचा छगन भुजबळांवर रोख-
काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नसल्याचंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय. मंत्री जास्त आहेत. पूर्वी 28 मंत्री आणि बाकी राज्य असायचे पण आता तसे नाही. त्यामुळे काहींना एकच खाते आले आहे, असंही अजित पवारांनी सांगितले. आपण विचारावर ठाम आहोत. आपण भाजप सोबत असलो तरी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करू, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांच्या विधानावर छगन भुजबळ काय म्हणाले?
नवीन लोकांना संधी द्यायला हवी, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर देखील छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. चांगली गोष्ट आहे, पण हे ठरवलं पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे, की 67-68 पर्यंत तरुण म्हणायचं?, मी अगोदरच म्हणालो होतो, मला लोकसभेत पाठवा तिथं थांबावं लागलं, राज्यसभेत थांबावं लागलं, तेव्हा म्हणाले राज्यात गरज आहे. आता म्हणतात राज्यसभेत जा...म्हणजे मी विधासभेत राजीनामा द्यावा, हे कसं शक्य आहे?, असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का?, या प्रश्नावर मला माहित नाही, तुम्हाला काय निष्कर्ष काय काढायचा तो काढा, असं छगन भुजबळांनी सांगितले.