काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 175 जागा निवडून येतील, अजित पवारांना विश्वास
भाजप-शिवसेना सरकारच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झालं आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.
पुणे : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 175 जागा निवडून येतील, अशा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील तरुण शेतकरी सध्या अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा असलेल्या जागेपासून जवळच एका तरुण शेतकऱ्याने भाजपाचा टी-शर्ट घालून आत्महत्या केली. इतका दुःखद प्रकार घडला असूनही मुख्यमंत्री त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले नाही, असं अजित पवारांनी म्हटलं.
भाजप-शिवसेना सरकारच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झालं आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. राज्याच्या डोक्यावर पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे. याबद्दल सरकारकडून कुणीही बोलताना का दिसत नाही, असा सवाल अजित पवारांनी विचारला.
मुख्यमंत्री सातत्याने आम्हाला विरोधक दिसतच नाहीत, असं वारंवार सांगत आहेत. जर विरोधक मैदानात नाहीत तर राज्यात इतक्या सभा का घेत आहेत? केंद्रातून इतके मंत्री कशासाठी येत आहेत? नरेंद्र मोदी, अमित शहा कोणासाठी सभा घेत आहेत? निवडणुकीच्या आधी यात्रा काढण्याची गरज का भासली? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित करत विरोधकांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पाच रुपयात तर शिवसेनेने 10 रुपयात जेवण्याची थाळी देण्याचे आश्वासन दिलं आहे. एक रुपयात आरोग्य तपासणी करणार असल्याचं आश्वासन शिवसेनेनं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. मात्र एक रुपयात साधा चहा येत नाही आणि हे आरोग्य चाचणी करायला निघाले. पाच वर्षे काय झोपा काढत होते का? असा टोला अजित पवारांनी लगावला.