एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षस्थ नेते बाहेर राहिले नसते : मुख्यमंत्री
जर सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षस्थ नेते भाजपमध्ये असते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे. मात्र आम्हाला सरकारी यंत्रणांचा वापर करायचा नव्हता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई : जर सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षर्थ नेते बाहेर राहिले नसते, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला. मनसे आता उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाली आहे, असा घणाघातही फडणवीसांनी केला. तर शरद पवार हे राज्यात जातीभेदाचं विष पसरवत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.
जर सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षस्थ नेते राहिले नसते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे. मात्र आम्हाला सरकारी यंत्रणांचा वापर करायचा नव्हता, असं म्हणत फडणवीसांनी दबावतंत्राचा आरोप फेटाळून लावला.
जीएसटीमुळे भ्रष्टाचार बंद झाला आणि सरकारी तिजोरीत पैसा आला. त्यामुळे तो सर्वसामान्य, शेतकरी यांच्यापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून पोहचवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या घोषणा भाजपने कधीच गांभीर्याने घेतल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या खात्यात 72 हजार कुठून येणार? हे राहुल गांधी सांगू शकले नाहीत. मात्र भाजप जबाबदार पक्ष आहे. आम्ही सत्तेत येणारच आहोत. त्यामुळे शब्द देताना तरतूद करावीच लागेल. संवेदनशील पंतप्रधानाने समाजाची गरज ओळखून केलेलं संवेदनशील घोषणापत्र, अशा शब्दात फडणवीसांनी भाजपच्या संकल्पपत्राचं वर्णन केलं.
प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी बोललेच नव्हते, असा दावा फडणवीसांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला. कोणतीही व्हिडिओ क्लीप किंवा भाजपचं संकल्पपत्र काढून बघा, असं खुलं आव्हानही फडणवीसांनी दिलं. भाजपने दिलेल्या 540 आश्वासनांपैकी 520 पूर्ण झाली आहेत, तर 20 पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, असंही ते म्हणाले.
राम मंदिर हा आस्थेचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टात राम मंदिराच्या बाजूनेच निकाल लागेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. बालाकोटचा पुरावा मागणाऱ्यांना देशद्रोही म्हटलंच नाही. मात्र सैन्याने दिलेल्या माहितीवर आतापर्यंत कोणी अविश्वास दाखवला नव्हता, असं फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे पूर्णपणे फ्रस्ट्रेटेड आहेत. मनसे आता उनसे झाली आहे. उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना, अशी टीकाही फडणवीसांनी केली. राज ठाकरे हे वाट चुकलेले नेते, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वर्णन केलं.
मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, हे वारंवार जनतेच्या मनावर ठसवलं, तर द्वेष निर्माण होईल असं शरद पवारांना वाटतं, असा घणाघातही फडणवीसांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही शरद पवार चालवत आहेत, असं दिसतंय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. राष्ट्रवादीने कशी वागणूक दिली हे धनगर समाजाने पाहिलं, त्यांचा आमच्यावर विश्वास असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेना-भाजपमध्ये अनेक कुरबुरी झाल्या, कलगीतुरे रंगले, मात्र विकासाच्या मुद्द्यावर कायमच एकमत झालं. शिवसेनेसोबत टोकाचे मतभेद होते, मात्र कधीच एकमेकांपासून दूर गेलो नाही, असा दावाही फडणवीसांनी केला.
शिवसेनेच्या दबावामुळे किरीट सोमय्यांचं तिकीट कापलं नाही, दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला
माझ्या पक्षातील निर्णय मी घेईन, असं शिवसेनेतून विरोध पदाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं होतं, असा दावाही फडणवीसांनी केला.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपणहून चौकशीची मागणी करत राजीनामा दिला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी किंवा सुमित्रा महाजन यांना तिकीट दिलं नसलं, तरी त्यांनी बंड केलं नाही, याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधलं.
गेल्या वेळीपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे देशात एनडीएला संपूर्ण बहुमत मिळेल, अशी खात्रीही फडणवीसांना वाटते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement