जिल्ह्यात एक आणि राज्यात एक, असं चालणार नाही; मुख्यमंत्र्यांचा विनायक मेटेंना अल्टिमेटम
बीडच्या स्थानिक राजकारणामध्ये पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचं वैर आहे. मात्र राज्याच्या राजकारणात विनायक मेटे यांना मुख्यमंत्री कायम पाठीशी घालत असल्याचं चित्र यापूर्वी पाहायलाला मिळालं होतं.
बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी बीड जिल्ह्यात भाजपाला सहकार्य करणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे काल झालेल्या औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मेटेंना अल्टिमेटम दिला आहे. जिल्ह्यात एक आणि राज्यात एक, असं चालणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याच्या राजकारणामध्ये विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष भाजपासोबत आहे. मात्र विनायक मेटे आणि महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वैर या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपासाठी नुकसानदायक ठरु शकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांनी यापुढे राज्यात भाजपाचा प्रचार करायला जायचे कसे? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला आहे. जर माझ्या जिल्ह्यामध्ये मित्रपक्ष भाजपला सहकार्य करणार नसेल, तर मग मी इतर जिल्ह्यात जाऊन प्रचार कसा करु? अशी भूमिका घेतल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंसंदर्भात जाहीर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचा आरोप शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे शिवसंग्राम राज्यात भाजपसोबत काम करेल, मात्र बीड जिल्ह्यात काम करणार नाही, असा निर्णय शिवसंग्रामने घेतला. काम न करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरदेखील ही बाब घालणार असल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितले. शिवसंग्रामच्या या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
बीडच्या स्थानिक राजकारणामध्ये पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचं वैर आहे. मात्र राज्याच्या राजकारणात विनायक मेटे यांना मुख्यमंत्री कायम पाठीशी घालत असल्याचं चित्र यापूर्वी पाहायलाला मिळालं होतं.
पंकजा मुंडे यांच्या प्रखर विरोधामुळे विनायक मेटे यांना मंत्रिपद मिळाले नाही, मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाला भरभरुन महामंडळाच्या जागा दिल्या. मात्र पंकजा मुंडे यांच्या विनायक मेटे संदर्भातील भूमिकेपुढे अखेर आज मुख्यमंत्र्यांना मेटेंना अल्टीमेटम द्यावा लागला, अशी चर्चा सध्या बीडमध्ये ऐकायला मिळत आहे