Chandgad Vidhan Sabha : चंदगडच्या विकासासाठी नंदाला तुमच्या स्वाधीन करते, माजी आमदार संध्यादेवी कुपेकरांची लेकीसाठी भावनिक साद
Chandgad Vidhan Sabha : माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी काल चंदगडमध्ये बोलताना भावनिद साद घातली. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये नंदिनी बाभुळकरांसाठी सभा पार पडली.
Chandgad Vidhan Sabha : चंदगडच्या विकासासाठी नंदाला तुमच्या स्वाधीन करत असल्याचे सांगत माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी चंदगडच्या जनतेला भावनिक साद घातली. चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नंदाताई बाभुळकर रिंगणात आहेत. माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी काल चंदगडमध्ये बोलताना भावनिद साद घातली. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये नंदिनी बाभुळकरांसाठी सभा पार पडली.
कुपेकरांचे सामाजिक कामाचे अनुवंशिक गुण नंदाताईमध्ये
संध्यादेवी कुपेकर यांनी आपली लेक कधीच आपल्याला नाराज करणार नाही असे सांगत कुपेकरांचे सामाजिक कामाचे अनुवंशिक गुण नंदाताईमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे 80 टक्के काम नंदाताई करत होत्या, त्यामुळे स्थानिक कामाचा अनुभव त्यांना असल्याचे त्या म्हणाल्या. मी आज माजी आमदार म्हणून बोलत नाही तर एक आई म्हणून लेकीला संधी देण्याची विनंती करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तुमच्या सारख्या गद्दाराला गाडायला मला आणलं आहे
दरम्यान, नंदिनी बाभुळकर यांनी आमदार राजेश पाटील यांच्यावर चांगलीच तोफ डागली. त्या म्हणाल्या की, विकासाच्या नावाखाली शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत गेले. 1600 कोटी रुपयांचा डंका पिटला जात आहे, पण त्यांनी विकास केवळ कंत्राटदार यांचा केला आहे. शरद पवार यांनी मला तुमच्या सारख्या गद्दाराला गाडायला मला आणलं आहे, अशा शब्दात नंदिनी बाभुळकर यांनी आमदार राजेश पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
तर ताईगिरी काय असते हे मी दाखवून देईन
नंदाताई बाभुळकर म्हणाल्या की, चंदगड विधानसभा मतदार संघात दादागिरी केली तर ताईगिरी काय असते हे मी दाखवून देईन, चंदगड विधानसभा मतदार संघातील जनता निष्ठावंत आहे. 2019 साली भरलेलं ताट आम्ही दुसऱ्याच्या हातात दिलं. आम्ही प्रत्येकजण राबलो पण त्यांनी एक वर्षाच्या आत गुण दाखवायला सुरुवात केली. विकासाच्या नावाखाली शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत गेले.
मी तुम्हाला सोडून कुठंही जाणार नाही, काही काळजी करू नका
त्यांनी सांगितले की, शरद पवार साहेब आणि बाबासाहेब कुपेकर यांची मैत्री अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कुपेकर साहेब यांनी शरद पवार यांना साथ दिली. माझ्या अस्थी चंदगडच्या पाण्यात विसर्जन कर म्हणून बाबांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली होती. इथल्या प्रत्येक पाण्याच्या थेंबात बाबासाहेब कुपेकर आहेत. मी तुम्हाला सोडून कुठंही जाणार नाही, काही काळजी करू नका. गेल्या काही वर्षात राज्यात लोकशाही धुळदान उडाली आहे. अलिकडे बटेंगे तो कंटेंगे म्हणत आहेत, पण मी सांगते जुडेंगे तो जितेंगे.दिल्लीसमोर लोटांगण घालणाऱ्या या सरकारला महाराष्ट्र हद्दपार करेल, अहंकारी लोकांना मातीत घातल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या