BJP Manifesto | फुले दाम्पत्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' मिळावा यासाठी पाठपुरावा करणार, भाजपचं आश्वासन
विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. सावरकर आणि फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भाजपने आपल्या संकल्पपत्रात म्हटलं आहे.
मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा ही मागणी सातत्याने केली जात आहे. हीच मागणी लक्षात घेत सावरकर आणि फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. भाजपच्या संकल्पपत्रात दुष्काळमुक्तीचा संकल्प करण्यात आला आहे. भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थित संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्र सरकारला शिफारस केली असून त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. याशिवाय ज्यांनी ज्यांनी सामाजिक कार्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, त्यांचा गौरव झाला पाहिजे याचाही आम्ही पाठपुरावा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा ही मागणी शिवसेनेकडूनही सातत्याने होत आहे.
भाजपने संकल्पपत्रात दुष्काळमुक्त महाराष्ट्रचा संकल्प केला असून दुष्काळ, पाणी आणि रोजगार या तीन गोष्टीवर जास्त भर दिला आहे. रोजगारनिर्मिती, नदीजोड प्रकल्प, ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था, वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, आरोग्य, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा, ग्राम विकास, रेल्वे विकास अशा विविध विषयांवर जाहिरनाम्यातून घोषणा करण्यात आली आहे. तर शहरी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून, आयटी पार्कची स्थापना, 1 कोटी रोजगाराची निर्मिती, इंटरनेटच्या मदतीनं प्रत्येक घर जोडण्याची योजना अशा वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
भाजपच्या संकल्पपत्रातील 16 ठळक मुद्दे- दुष्काळमुक्ती (पश्चिम घाटातील पाणी मराठवाड्यात वळवणार)
- मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून 11 धरणांना जोडून मराठवाड्याचे दुष्काळनिर्मूलन
- 1 करोड नोकऱ्या निर्माण करणार
- 1 करोड लोकांना बचत गटाशी जोडणार
- 5 लाख कोटींची गुंतवणूक करणार
- राज्यातील रस्ते दुरुस्तीसाठी स्वतंत्र तंत्र अवगत करणार
- प्रत्येक घरात वीज आणि शुद्ध पाणी
- भारत नेटच्या माध्यमातून सर्व घरांना इंटरनेटशी जोडणार
- शिक्षण मूल्यांवर आधारित करणार
- सोशल सिक्युरिटीत कामगारांना आणणार
- शहिदांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन धोरण
- विस्थापितांचे योग्य पुनर्वसन धोरण
- शेतीसाठी दिवसा 12 तास अविरत वीजपुरवठा देण्याचा संकल्प
- सौर ऊर्जेचा वापर करून प्रदूषणमुक्ती