Parag Shah: मोठी बातमी: घाटकोपरचे उमेदवार पराग शाह घरात पाय घसरुन पडले, हाडाला मार लागल्याने डॉक्टरांचा घरीच बसण्याचा सल्ला
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: पराग शाह हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. ते पाय घसरुन पडल्यामुळे सध्या जागेवर बसून प्रचाराचे नियोजन करत आहेत.
मुंबई: विधानसभा निवडणुकीतील राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार असणारे भाजपचे नेते पराग शाह यांच्याबाबत एक दुर्दैवी प्रकार घडला आहे. पराग शाह हे मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून (Ghatkoper East Vidhan Sabha) निवडणूक लढवत आहेत. मात्र, ते सध्या दुखापत झाल्यामुळे प्रचार करु शकत नाहीत. पराग शाह (Parag Shah) हे मंगळवारी त्यांच्या घरी पाय घसरुन पडले होते. यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी पराग शाह यांच्या डाव्या पायाच्या हाडाला दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे डॉक्टरांनी पराग शाह यांनी घरीच राहून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे.
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते प्रकाश मेहता हेदेखील इच्छूक आहेत. आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी ते प्रचंड आग्रही होती. त्यामुळे पराग शाह यांचा पत्ता कट होणार, अशी चर्चा सुरु होती. परंतु, भाजप नेतृत्त्वाने पुन्हा एकदा पराग शाह यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनाच घाटकोपर पश्चिममधून तिकीट दिले. राज्यातील सर्वात धनाढ्य उमेदवार असल्यामुळे पराग शाह यांची प्रचंड चर्चा आहे. त्यांच्याकडे जवळपास 3000 कोटींची संपत्ती आहे. मात्र, आता पराग शाह यांचा पाय जायबंदी झाल्यामुळे घाटकोपर पूर्व मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते उमेदवाराशिवाय कसा प्रचार करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पराग शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, शस्त्रक्रिया केल्यास ऐन प्रचाराच्या काळात रुग्णालयातच राहावे लागेल, याची खात्री असल्याने पराग शाह यांनी तुर्तास शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांना पूर्वीसारखे मतदारसंघात फिरता येत नाही. ते सध्या आपल्या कार्यालयात बसूनच प्रचाराची आखणी करत आहेत.
पराग शाह यांना दुखापत झाल्यामुळे आता भाजपचे कार्यकर्तेच घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. घाटकोपर पूर्व मतदारसंघात पराग शाह यांचे पारडे जड मानले जात आहे. हा मतदारसंघ गुजरातीबहुल परिसर म्हणून ओळखला जातो. जैन, गुजराती आणि मारवाडी समाज ही भाजपची पारंपरिक व्होटबँक असल्याचे मानले जाते. त्यामुळे पराग शाह यांच्यासाठी लढाई फारशी अवघड नसली तरी यंदा त्यांच्यासमोर शरद पवार गटाच्या राखी जाधव आणि मनसेच्या संदीप कुलथे यांचे आव्हान आहे. मविआची एकत्रित ताकद आणि राखी जाधव यांच्या आक्रमक नेतृत्त्वशैलीमुळे त्या पराग शाह यांच्यासमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
मनसेचे बाळा नांदगावकरही जायबंदी
शिवडी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या पायालाही 2 नोव्हेंबर रोजी प्रचार करताना दुखापत झाली होती. त्यामुळे बाळा नांदगावकर यांनी चार दिवस प्रचारातून विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता बाळा नांदगावकर हे व्हिलचेअरवर बसून शिवडीत प्रचार करताना दिसत आहेत.
आणखी वाचा
500 कोटीचे 3300 कोटी कसे झाले, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाहांनी लेखाजोखा मांडला