सक्षम कार्यकर्ते असताना आयात उमेदवाराला तिकीट का? राजुरा मतदारसंघातील भाजपच्या दोन आमदारांचा बंडखोरीचा इशारा
मतदारसंघात सक्षम कार्यकर्ते असताना आयात उमेदवाराला तिकीट का? असा सवाल करत राजुरा मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदारांसह कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 चंद्रपूर : मतदारसंघात सक्षम कार्यकर्ते असताना आयात उमेदवाराला तिकीट का? असा सवाल करत राजुरा मतदारसंघातील (Rajura Assembly constituency) भाजपच्या 2 माजी आमदारांसह सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार देवराव भोंगळे (Deorao Bhongle) यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. पक्षश्रेष्ठींनी उमेदवार बदलला नाही तर आमच्यापैकी कोणालाही निवडणुकीत उभं करून त्याला निवडून देऊ, असा थेट इशारा देत भाजपच्या (BJP) नेत्यांनी बंडखोरीचा स्पष्ट इशारा दिला आहे.
देवराव भोंगळे यांच्याच फाजील आत्मविश्वासामुळे लोकसभेत भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला. असा आरोपही भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांनी केला आहे. भाजपच्या कोणत्याही स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यासाठी नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून आमच्या भावना कळवणार, असा पवित्रा राजुरा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत देवराव भोंगळे?
दरम्यान, देवराव भोंगळे हे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचे अत्यंत निकटवर्ती असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या उमेदवारांची दुसऱ्या यादीमध्ये 22 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातून देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. देवराव भोंगळे हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे जेष्ठ आमदार सुभाष धोटे आणि शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार वामनराव चटप यांच्यासोबत होणार आहे. देवराव भोंगळे यांच्या रूपाने भाजपने या मतदारसंघात एक तरुण आणि नवीन चेहरा दिला आहे. मात्र या उमेदवारीला भाजपच्या नेत्यांनी विरोध दर्शवला आहे.
सिंदखेड राजा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्यापही घोषित नाही
सिंदखेड राजा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून डॉ.राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळाली आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. मात्र महायुतीकडून अद्यापही उमेदवारी बाबत रस्सीखेच सुरूच असल्याच समोर आल आहे. सिंदखेड राजा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा मतदार संघ आहे. मात्र निवडणुकीच्या काही दिवस आधीच डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केल्याने आता वेळेवर अजित पवार गटाकडे उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मतदारसंघात महायुतीतील इतर घटक पक्षातील उमेदवार हे अजित पवारांच्या भेटीला मुंबईत ठाण मांडून आहेत तर मतदारसंघातील शिंदे गटाचे प्रबळ दावेदार माजी आ. शशिकांत खेडेकर तर भाजपचे विनोद वाघ यांच्यात या जागेवर रस्सीखेच सुरू आहे. मात्र महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षातील उमेदवार असला तरी त्याला अजित पवार गटात प्रवेश करूनच उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे अद्यापही सिंदखेड राजा येथील महायुतीचे उमेदवारी घोषित करण्यात अजूनही रस्सीखेच सुरू आहे.
हे ही वाचा