भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध, काँग्रेस न्यायालयात जाणार
राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेत आज विरोधी काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी हरकत घेतली होती.
अहमदनगर : शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अर्जावर घेतलेली हरकत फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विखेंचा अर्ज वैध ठरवलाय. मात्र हा निर्णय आम्हाला मान्य नसून न्यायालयात दाद मागणार असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेत आज विरोधी काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी हरकत घेतली होती. त्यावर दुपारी तीन वाजेपासून शिर्डीत सुनावणी सुरू होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरवलं आहे.
नोटरी करताना वकीलाचा परवाना संपला असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र संबधित वकीलाने आपला नुतनीकरण झालेला परवाना सादर केल्याने या नाट्यावर पडदा पडला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला चार पानांचा लेखी निकाल संध्याकाळी जाहीर केला. यात काँग्रेसने केलेले सर्व आक्षेप फेटाळून लावत विखेचा अर्ज वैध ठरवला आहे.
मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य नसून आम्ही या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी म्हटलं. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांचा अर्ज बाद होईल अशी आशा लावून बसलेल्या विरोधकांच्या आशेवर पाणी फिरलं आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी शिर्डी विधानसभेची निवडणूक न्यायालयात जाणार हे मात्र नक्की आहे.