बारामतीत सुरुंग पेरलाय, आता 23 तारखेला स्फोट व्हायची वाट पाहायची : कांचन कुल
युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी रोड शो करत इंदापूर तालुक्यात पहिली प्रचार फेरी पूर्ण केली. कांचन कुल या आज व उद्या इंदापूर तालुका दौऱ्यावर आहेत.
बारामती : लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्ष जोमाने आपला प्रचार करत आहेत. सर्वत्र उमेदवार निवडणुकीत कशी बाजी मारता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बारामतीच्या युतीच्या उमेदवार कांचन कुलही निवडणुकीच्या प्रचारासाठी जंग जंग पछाडत आहेत. कांचन कुल यांनी थेट विद्यमान खासदास सुप्रिया सुळे यांना आव्हान देत, आपण निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
कांचन कुल यांनी रोड शो करत इंदापूर तालुक्यात पहिली प्रचार फेरी पूर्ण केली. कांचन कुल या आज व उद्या इंदापूर तालुका दौऱ्यावर आहेत. आज तालुक्यात पहिल्यांदाच भिगवण याठिकाणी आल्यानंतर मतदारांनी त्यांचे जल्लोशात स्वागत केलं. रोड शो, प्रचार फेऱ्या करत कांचन कुल यांनी मतदारांशी संवाद साधला.
"बारामतीत महायुतीचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. पवारांच्या काटेवाडीत विरोधकांना सभा घेणं कठीण असतं. दहा-बारा लोकही याठिकाणी जमा होत नाहीत. मात्र आमच्या प्रचारात 500 हून अधिक लोक असल्याने आता अशाच स्वरुपात बारामतीत सगळीकडून सुरुंग लागलाय, आता केवळ 23 तारखेला स्फोट व्हायची वाट पाहायची आहे", असं कांचन कुल यांनी म्हटलं.
येत्या 23 मे रोजी मताधिक्य आपल्याच मिळणार असून विजय हा आपलाच असल्याचा विश्वास कांचन कुल यांनी व्यक्त केला. कांचन कुल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे.