Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड अन् शिवसेनेची युती तुटणार; संभाजी ब्रिगेडचा स्वबळाचा नारा, 'इतके' उमेदवार करणार जाहीर
Maharashtra Assembly Election 2024: संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील युती तुटणार असल्याची माहिती आहे. संभाजी ब्रिगेड राज्यात उमेदवार जाहीर करणार आहे.
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. काही पक्ष एकत्रित लढण्याची तयारी करत आहे, तर काही ठिकाणी पक्ष युतीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील युती तुटणार असल्याची माहिती आहे. संभाजी ब्रिगेड राज्यात ५० पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करणार आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत अडीच वर्षे असणारी युती संभाजी ब्रिगेड तुटणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संभाजी ब्रिगेडच्या जागांवरती उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाराज असून त्यांनी आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत. संभाजी ब्रिगेड शिवसेना ठाकरे गटासोबत असणारी अडीच वर्षांची युती तोडणार आहे. लवकरच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संभाजी ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने काही दिवसांपुर्वी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड मनोज जरांगें यांच्यबरोबर जाणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाकडून आता नेमकं कोणाला उमेदवार म्हणून जाहीर केलं जाईल हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
अडीच वर्षाची युती तोडणार असल्याची घोषणा
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटासोबत असणारी गेले दोन ते अडीच वर्षाची युती तोडणार असल्याची घोषणा आज पुण्यात संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली असून विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला योग्य मान मिळाला नसल्याचा आरोप मनोज आखरे आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला पाच ते सहा जागा देणार असल्याचं या आधी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. मात्र आम्हाला आता एकही जागा दिली जात नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितलं आहे. तर या विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वतंत्रपणे 50 जागा लढणार असल्याची घोषणा मनोज आखरे यांनी पुण्यातून केली आहे. त्यांच्या या निर्णयाचा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसण्याची शक्तता आहे.