एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ : भाजपसमोर जागा टिकवण्याचं आव्हान
2009 च्या मतदारसंघ फेररचनेनंतर आस्तित्वात आलेला भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा तसा समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा गड असल्यासारखाच. बहुभाषिक आणि मुस्लीम मतदार सर्वाधिक असलेला. 2014 च्या निवडणुकीत भिवंडी पश्चिमवर भाजपने झंडा रोवला. पण काँग्रेसने हिंदू उमेदवार दिला तर भाजपपुढे आव्हान उभं राहू शकतं.
1990 पासून समाजवादी पक्षाचा गड राहिलेला भिवंडी विधानसभा मतदारसंघ 2014 साली भाजपच्या ताब्यात गेला. आजवर भिवंडी मतदार संघात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. ज्यावेळी 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली त्यावेळी भिवंडीचे विधानसभेचे पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण असे भाग झाले.
1990 नंतर एकदा शिवसेना सोडल्यास आजवर इथे वरचष्मा राहिला आहे तो समाजवादी पार्टी आणि नंतर काँग्रेसचा. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघ भाजप-शिवसेना युतीच्या पारंपरिक जागा वाटपात शिवसेनेच्या ताब्यात होता. 2014 साली दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले आणि मोदी लाटेत ही जागा भाजपने जिंकली. या ठिकाणाहून भाजपचे महेश चौगुले निवडून आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादीने आपापले तगडे उमेदवार रिंगणात उतरवले होते. ज्यात भाजपचे महेश चौगुले 42,483 मते घेऊन विजयी झाले.
या मतदार संघात भिवंडी शहरासह गावाचाही समावेश होतो. ज्यात 40 टक्के मतदार हा मुस्लिम आहे तर उर्वरित मतदार हा हिंदू असून आगरी, गुजराती, राजस्थानी, जैन, तेलुगू आणि उत्तर भारतीय असा विभागला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणचा इतिहास पाहता आजपर्यंत भिवंडीतल्या निवडणुका या थेटपणे हिंदू-मुस्लिम अशाच झालेल्या आहेत.
गेल्यावेळी निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव, काँग्रेसच्या नेतृत्वाप्रती स्थानिकांमध्ये असलेली नाराजी आणि एकूण संघ, भाजप आणि मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लावलेला जोर, परप्रांतीयांची शिवसेनेप्रती असलेली नापसंती यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता.
यावेळी मात्र गणितं जरा बदलेली बघायला मिळू शकतात. कारण आत्ताच्या लोकसभा निवडणुकीतही इथे आजी-माजी खासदार एकमेकांच्या समोर भिडले होते. भाजपकडून विद्यमान खासदार कपिल पाटील आणि काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे. कपिल पाटील यांना पाच लाख 23 हजार मते मिळाली तर म्हणजे जवळपास 52 टक्के कपिल पाटील यांना मिळाली तर सुरेश टावरे यांना तीन लाख 67 हजार म्हणजे 36 टक्के.
स्वाभाविकच भाजपने सलग दुसऱ्यांदा एक लाख 56 हजार मतांसह लोकसभा निवडणूक जरी जिंकली. लोकसभा निवडणुकीत भिवंडी शहरातून भाजपला 55 हजार मते मिळाली तर काँग्रेसला 62 हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे भिवंडी पश्चिम विधानसभा निवडणुकीत ही कसर भरुन काढावी लागणार आहे.
याशिवाय 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी संघाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे इथली निवडणूक गाजली होती. महात्मा गांधींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. याप्रकरणी भिवंडीचे संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता, ज्यामुळे राहुल गांधीचा सतत भिवंडी दौरा करावा लागला होता. त्यामुळे जिल्ह्यातल्या नेत्यांसह स्थानिक नेतृत्वही हायकमांडच्या संपर्कात होतं.
शिवाय मध्यंतरी झालेल्या महापालिका निवडणुकांत पहिल्यांदाच भिवंडीत काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे. मुस्लिमांची एक गठ्ठा मते काँग्रेसला मिळाली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खास करुन मुस्लिम मतदारांमध्ये एक उत्साह आहे.
असं असलं तरी शिवसेना-भाजप या विधानसभेसाठी एकत्र लढले तर मात्र काँग्रेससाठी ही लढाई मोठी असेल. कारण गेल्यावेळी सेना आणि भाजपच्या मतांची बेरीज ही 62 हजाराच्या घरात होती. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज ५५ हजाराच्या घरात. त्यामुळे याही वेळी मोठ्या विजयानं उमेदवार जिंकण्याची आशा कमीच आहे.
शिवाय जर काँग्रेसने आणि वंचित बहुजन आघाडी अथवा एमआयएमने जर इथं मुस्लिम उमेदवार दिला तर मात्र या ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण होऊन भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर होईल. पण काँग्रेसनं हिंदू उमेदवार दिला तर भाजपला विजयश्री खेचून आणायला मोठे परिश्रम करावे लागतील.
त्यामुळे हिंदू-मुस्लिम अशी थेट लढत होवू शकते अथवा हिंदू-हिंदू अशी जरी लढत झाली तर भाजपला आपली जागा कायम राखण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे.
भिवंडी उद्योग शहर म्हणून नामांकित आहे. परंतू हीच याची कमजोरी ठरते आहे. कारण असंघटीत उद्योग, त्यासाठी बाजार उपलब्ध नसणं आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची बिझनेस पार्कची मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. सोबतच रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी पासून सुटका करण्यात नेतृत्व अपयशी ठरलं असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
इच्छूक उमेदवार
भाजप - महेश चौगुले
काँग्रेस - शोएब गुड्डू, सुरेश टावरे, प्रदीप राका
वंचित - सुहास बोंडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
शिक्षण
Advertisement