एक्स्प्लोर

बार्शी विधानसभा । बार्शी तिथं कुणाची व्हणार सरशी, 'साहेब' की 'भाऊ' कोण मारणार बाजी?

प्रादेशिक दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात असला तरी बार्शीला खासदार मात्र मराठवाड्यातला मिळतो. यामुळे नेहमीच लोकसभा क्षेत्रातला एक भाग म्हणून बार्शी नेहमीच उपेक्षित राहिल्याची टीका सामान्य वर्गातून होत असते.

बार्शी तिथं सरशी हा शब्द बहुतेकांच्या ओळखीचा आहे. सोलापूर जिल्ह्यातला एक तालुका असं सांगायची विशेष गरज बार्शीला लागत नाही. कागदोपत्री पश्चिम महाराष्ट्रात असलेला हा तालुका लोकसभेला मराठवाड्यातल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलेला आहे. एवढंच नाही तर बहुतांश वेळा उस्मानाबादचा खासदार ठरवण्यात बार्शीची साथ हाच महत्वाचा फॅक्टर राहिलेला आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघात तसा राज्यभरात चर्चिला जाणारा मतदारसंघ. प्रादेशिक दृष्ट्या  पश्चिम महाराष्ट्रात असला तरी बार्शीला खासदार मात्र मराठवाड्यातला मिळतो. यामुळे नेहमीच लोकसभा क्षेत्रातला एक भाग म्हणून बार्शी नेहमीच उपेक्षित राहिल्याची टीका सामान्य वर्गातून होत असते. तर अशा या बार्शी विधानसभा मतदारसंघांचं राजकारण कुठल्याही एका पक्षाभोवती नाही तर व्यक्तिकेंद्रित असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातही 1999 पासून पुढचं राजकारण हे दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोन नावांभोवतीच फिरताना पाहायला मिळत आहे. बार्शीत सध्या तरी 'साहेब' आणि 'भाऊ' या दोन नावाचेच पक्ष आस्तित्वात असल्याचे चित्र आहे. या दोन्हीही नेत्यांनी अनेकदा पक्ष बदलले असल्यामुळे इथे 'स्वार्थासाठी पक्ष बदलला' अशी वाक्यं या नेत्यांच्या तोंडून तरी किमान ऐकायला मिळत नाहीत. आगामी निवडणुकीची थेट लढाई याच दोन नेत्यांमध्ये होणार हे स्पष्ट आहे. अर्थात या रणामध्ये वंचित बहुजन आघाडी कितपत बाजी मारते हे बघण्यासारखे आहे. दोन्ही नेत्यांच्या कोलांट्याउड्या तसा या मतदारसंघावर माजी मंत्री आणि राज्यभर ज्यांच्या भाषणाची फर्माईश असते असे दिलीप सोपल यांचा मोठा प्रभाव आहे. 2004 चा अपवाद वगळता आतापर्यंत सहा वेळा बार्शीचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. यातला काही काळ बार्शीला लाल दिवा देखील त्यांच्या माध्यमातून मिळाला. मात्र त्यांची राजकीय कारकीर्द काहीशी हटके अशीच असल्याचे पाहायला मिळाले. दोन वेळा राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह वगळता ते बाकी चार वेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आले. अर्थात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे 'खास' मर्जीतले अशी त्यांची ओळख. आपल्या खुमासदार आणि खुसखुशीत भाषणाच्या स्टाइलमुळे त्यांनी एक वेगळी ओळख बनवली आहे. सोपलांच्या नावावर प्रत्येकवेळी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे. तर राऊतांनी देखील वेळोवेळी संधी साधत पक्षबदल केला आहे. सोपलांनी  काँग्रेस-राष्ट्रवादी-अपक्ष-राष्ट्रवादी असा प्रवास केला असला तरी शरद पवारांचे विश्वासू अशी ओळख मात्र कायम ठेवली. दुसरीकडे राऊतांनी शिवसेनेची चांगलीच हवा मतदारसंघात केली होती. मात्र नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना त्यांच्यासोबत त्यांनी शिवबंधन तोडले आणि काँग्रेसमध्ये गेले. यानंतर पुन्हा घरवापसी करत शिवसेनेत जाऊन निवडणूक लढवली. मात्र भाजप उमेदवारामुळे त्यांचा पराभव झाला. पुढे भाजपची सत्ता स्थापित झाल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बार्शी विधानसभा । बार्शी तिथं कुणाची व्हणार सरशी, 'साहेब' की 'भाऊ' कोण मारणार बाजी? थोडक्यात जाणून घेऊन इतिहास बार्शी विधानसभेचा 1962 पासूनचा इतिहास पाहिला तर बार्शी विधानसभेवर फक्त एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा जास्त बोलबाला राहिलेला आहे. 1978 साली राज्यात जनता दलाची लाट होती त्यावेळी कॉंग्रेसचे कृष्णाराव देशमुख यांनी जनता दलाचे पन्नालाल सुराणा यांचा पराभव केला होता.  1980 साली राज्यात आणि देशात इंदिरा कॉंग्रेसच्या राज्यातील लाटेत कॉंग्रेसचे बाबुराव नरके यांनी अर्जून बारबोले यांचा पराभव केला. 1985 साली पहिल्यांदा निवडणूक लढविणारे दिलीप सोपल निवडून आले.  1985 साली शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसपक्षाकडून ते आमदार झाले. 1990 साली काँग्रेस, 1995 अपक्ष, 1999 राष्ट्रवादी काँग्रेस, 2009 अपक्ष, 2014 राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर सोपल विधानसभेवर गेले. सलग सहावेळा वेगवेगळ्या चिन्हावर आमदार होण्याचा वेगळा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यासमोर विरोधक टिकू शकला नाही. पण  1999 पासून मात्र शेतकरी कुटुंबातून आलेल्या राजेंद्र राऊत अर्थात 'भाऊं'नी दिलीप सोपल अर्थात 'साहेबां'ना ठस्सल द्यायला सुरुवात केली. 1999 च्या पहिल्याच निवडणुकीत घासून फाईट देणाऱ्या राऊतांनी 2004 साली मात्र शिवधनुष्य हाती घेत पहिल्यांदा विधानसभा गाठली आणि सोपलांच्या गडाला  जोरदार हादरा दिला.  मात्र पुन्हा 2009 विधानसभा निवडणूकीत मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि बार्शी विधानसभेत कुरघोड्या पहायला मिळाल्या. राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेला रामराम ठोकत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेली जागा कॉंग्रेसकडे गेली कॉंग्रेस कडून राजेंद्र राऊत यांनी निवडणूक लढविली तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार दिलीप सोपल यांनी अपक्ष निवडणूक लढवून राजेंद्र राऊत यांचा पराभव करत पुन्हा विधानसभा गाठली. 2014 च्या निवडणुकीवेळी राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी लाट होती. विधानसभा निवडणुकीच्या एक वर्षे अगोदर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी कॉंग्रेसची साथ सोडत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली. शिवसेनेकडून राजेंद्र राऊत, राष्ट्रवादीकडून दिलीप सोपल तर भाजपकडून प्रथमच निवडणूक लढविणारे सध्याचे गृहनिर्माण सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे उमेदवार होते. या निवडणूकीत मिरगणे यांच्या उमेदवारीचा सरळ फटका राऊतांना बसला आणि पुन्हा सोपलांनी बाजी मारली.  या निवडणुकीनंतर शिवसेनेत असताना राजेंद्र राऊत यांनी एकहाती नगराध्यक्षपद आणि नगरपालिका खेचून आणली. यानंतर सर्वजण भाजपात गेले. त्यांना पक्षात घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री बार्शीत दाखल झाले होते, हे विशेष. आता काय होईल? भाजपमध्ये गेलेल्या राजेंद्र राऊत यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सोपलांच्या कित्येक वर्ष ताब्यात असलेली मार्केट कमिटीवर आपला झेंडा फडकावत मुंबईत आपला पत्ता सेट केला आहे. असं असलं तरी भाजपकडून गेल्या वेळचे उमेदवार राजेंद्र मिरगणे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. एव्हाना मिरगणे यांनी तशी तयारी देखील सुरु केली आहे. गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष बनवत मुख्यमंत्र्यांनी मिरगणे यांची ताकत देखील वाढवली आहे. त्यामुळे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि भाजपचे राजेंद्र मिरगणे यांच्यापैकी कोण्या एकाला उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यात आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे देखील लवकरच पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. सोपलांच्या शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चा आहेत, एव्हाना या आठवड्यात त्यांचा प्रवेश देखील होईल, अशा देखील चर्चा आहेत. त्यामुळे सोपल शिवसेनेत गेले तर शिवसेना महायुतीमध्ये ही जागा हक्काने मागून घेऊ शकते. एव्हाना फडणवीसांच्या 'सीटिंग आमदारांना' जागा देण्याच्या नियमानुसार शिवसेना या जागेवर आपला हक्क दाखवू शकते. असं झालं तर यामुळे राऊतांचा रस्ता खडतर होणार असल्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे मिरगणे यांना नुकताच कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यानंतर सोपलांच्या कार्यकर्त्यांकडून दोघांच्या फोटोसह अभिनंदनाचे मेसेजेस फिरत होते. शिवसेनेचे नेते आणि माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर देखील विधानसभेसाठी इच्छुक दिसून येत आहेत. वेळोवेळो सोशल माध्यमाच्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका ते मांडत असल्याचे दिसून देखील येत आहे. उस्मानाबाद लोकसभेत बार्शी निर्णायक उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मागील सहा निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिले आहे. एकंदरीत निवडणुकीच्या निकालामध्ये बार्शी तालुक्याची भूमिका ही निर्णायक राहिली आहे. लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील विरुध्द शिवसेनेचे रवींद्र गायकवाड अशी लढत झाली. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी युती असल्याने दिलीप सोपल व राजेंद्र राऊत या दोघांनीही पद्मसिंह पाटील यांचा प्रचारकेला. तालुक्यातून तब्बल पंधरा हजारांचे मताधिक्य मिळाले आणि पाटील संसदेत पोहोचले. 2014 च्या निवडणुकीतही पाटील विरुध्द गायकवाड असाच सामना झाला. बार्शी तालुक्याने यावेळी ५५ हजारांचा लीड दिल्याने गायकवाड  विजयी झाले.  यंदाच्या लोकसभेत मात्र 'बार्शीची सरशी' थोडी कमीच झालेली दिसली. निवडणुकीत आ.  राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर या दोघांमध्ये लढत झाली. यात समविचारी आघाडीतील एक महत्वाचे  शिलेदार मानले जाणारे राऊत भाजपच्या बाजूने अंतर्गत खिंड लढविण्यात आघाडीवर होते. मात्र, बार्शी मतदारसंघातील मतदारांनी त्यांनाही चिंतेत टाकले. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना अवघे 928 इतके मताधिक्‍य मिळाले आहे. विशेष म्हणजे, 2014 च्या निवडणुकीत माजी खासदार रवी गायकवाड यांना 55 हजारांचे मताधिक्‍य होते. एकमेकांचे लूप होल्स आणि सोशल मीडियात वॉर बार्शीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत राऊतांचा बोलबाला आहे. सध्या नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे. मात्र दुष्काळी स्थितीत शहरात झालेली पाणीबाणी त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. आपले वजन मुंबईत मजबूत आहे असे बोलणारे राऊत इथे बॅकफूटला आल्याचे पाहायला मिळाले सोबतच शहरात खड्डे आणि इतर समस्यांमुळे देखील सत्ताधारी म्हणून नेहमीच त्यांच्या टीका होत आहे. यामुळे शहरी मतदार त्यांच्यावर नाराज असल्याचे चित्र आहे. मात्र यावर स्थानिक आमदार म्हणून दिलीप सोपल यांनीही विशेष प्रयत्न केलेले दिसून आले नाहीत, त्यामुळे त्यांना काही फायदा होईल असेही चित्र नाही. मार्केट कमिटीमध्ये सोपलांवर झालेले आरोप, तसेच त्यांच्या साखर कारखान्यातील बुडीत बिलं यामुळे सोपल ग्रामीण भागात बऱ्याच अंशी बॅकफूटवर आहेत. याचा सर्व गोंधळ हा सोशल मीडियावर काही फेक तर काही ओरिजिनल अकाउंटवरून देखील पाहायला मिळतो. एकूणच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याचे काम दोन्ही गट अगदीच सक्षमपणे फेसबुकवर करत असल्याचे चित्र आहे. मात्र कुणी काय केलं? याचं  फलित तर येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानेच स्पष्ट होणार आहे. हे असतील उमेदवार बार्शी विधानसभा मतदारसंघातून अद्याप पक्ष निश्चित नसला तरी 'सोपलसाहेब' आणि 'राजाभाऊ' हे दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणार हे नक्की. यामध्ये आता राज्यस्तरीय 'महायुती' आणि 'महाआघाडी' ठरल्यानंतर बाकीच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. मात्र राजेंद्र मिरगणे यांनी बऱ्याच काळापासून भाजप बार्शी तालुक्यात मोठी केली आहे. त्यामुळे ते देखील उमेदवार असू शकतात. सोबतच शिवसेनेकडून भाऊसाहेब आंधळकर हे देखील इच्छुक दिसून येत आहेत. वंचित बहुजन आघाडीने देखील तालुक्यात मेळावे आणि कार्यक्रम घेत आपली दावेदारी सांगितली आहे. वंचितकडून देखील उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. वंचितकडून रियाज शेख, सिद्धेश्वर मोरे, शोएब सय्यद, शितल जानराव, आनंद काशीद, बापू सावंत, विनोद  वाणी, वसीम पठाण, अब्बासभाई शेख, किसन हजारे, महादेव काकडे, गुलमोहम्मद अत्तार अशी इच्छुकांची मोठी यादी आहे. एकंदरीत सध्या सोपल आणि राऊत या दोन्ही गटाकडील युवा गट मतदारसंघात जोशाने ऍक्टिव्ह झालाय. एकीकडे राजेंद्र राऊत यांचे पुत्र मार्केट कमिटीचे सभापती रणवीर राऊत युवा जोश जागवत गावोगावी कॉर्नरसभा, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. दुसरीकडे सोपलांचे नातू आर्यन सोपल देखील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आपल्या आजोबांसाठी जोमाने कार्यरत झालेले दिसून येत आहेत. दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी केलेल्या विकासकामांच्या धुरळ्याच्या पोस्ट फिरवत असतात.  मात्र मतदारसंघात अनेक समस्या कायम आहेत. दुष्काळाने रापलेला शेतकरी, अनेक गावांना आजही न मिळणारे पाणी, शहरात रस्ते, पाण्याच्या समस्या, युवकांची बेरोजगारी अशा अनेक समस्या मतदारसंघात आ वासून उभ्या आहेत. यावर आता 'साहेब' किंवा 'भाऊ' काही उतारा आणतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Embed widget