Balaji Kalyankar : शिंदेंच्या उमेदवाराच्या सभेसाठी आकडे टाकले, वीज चोरीचा व्हिडीओ व्हायरल
Balaji Kalyankar, नांदेड : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या सभेसाठी वीज चोरी करण्यात आली आहे.
View this post on Instagram
नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी आज (दि.3) प्रचाराचा नारळ फोडला. मात्र त्या ठिकाणी आयोजित प्रचार सभेसाठी वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. कल्याणकर यांच्या प्रचार सभेसाठी विद्युत खांबावरुन आकडे टाकून वीज घेण्यात आल्याचा व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. "हे तर चोरच आहेत हे त्यांनी देवाच्या दारात सिद्ध करून दाखवले. या चोरांनी आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं. पक्ष चिन्ह चोरल्यानंतर आता यांनी लाईट सुद्धा चोरलेली आहे . महादेवाच्या मंदिरात कधी चोरी लपत नसल्याची प्रतिक्रिया नांदेड उत्तरचे शिवसैनिकांनी दिली आहे.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने माजी महापौर अब्दुल सत्तार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर काँग्रेसच्या सत्तार यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे.
बालाजी कल्याणकर यांना मराठा आंदोलकांनी घेरलं होतं
शिंदेंचे आमदार बालाजी कल्याणकर यांना देखील मराठा आंदोलकांचा राग सहन करावा लागला होता. नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना सोमेश्वर येथे विकासकामाच्या उद्घाटनासाठी आले होते, त्यावेळी मराठा आंदोलकांनी घेराव घालून प्रश्न विचारले होते. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने दिलेल्या आश्वासनांची विचारणा आंदोलकांनी केली होती. त्यामुळे बालाजी कल्याणकर यांच्याविरोधात मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिल्यास त्यांना फटका बसू शकतो, अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत.