पाठीत वार करणाऱ्या औलादींपासून सावध राहा, उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल
नारायण राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाची वाट लावतील. चोर मित्राच्या घरात शिरत असताना मी शांत कसा बसू शकतो, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीकास्त्र सोडलं.
सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर तोफ डागली आहे. नारायण राणे मातोश्रीच्या मिठाला जागले नाहीत. नारायण राणेंच्या भाजप प्रवेशानंतर, पाठीत वार करणाऱ्या औलादींपासून सावध राहा, असा मित्रत्वाचा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे.
भाजप-शिवसेनेची युती आहे, मात्र तरीही कणकवलीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिवसेनेनं उमेदवार उभा केला आहे. भाजपने इतर कुणाला उमेदवारी दिली असती, तर मी त्याचं समर्थन केलं असतं. मात्र याचा अर्थ आमच्यामध्ये काही मतभेद आहेत, असा होत नाही.
इतिहासातील गोष्टींमधून आपण काही तरी शिकायचं असतं. नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले तेव्हा मी काँग्रेस आणि सोनिया गांधी यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आज मी भाजपला शुभेच्छा देतो. नारायण राणे भाजप विरोधात आणि भाजपने राणेंविरोधात काय-काय बोललं आहे, याचा माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मी भाजपवर टीका करण्यासाठी आलेलो नाही. केवळ माझ्या मित्रपक्षाला सावध करण्यासाठी आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नारायण राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाची वाट लावतील. चोर मित्राच्या घरात शिरत असताना मी शांत कसा बसू शकतो. कारण पाठीत वार करणारे माझ्या मित्रपक्षांकडेही नकोत, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. मान वाकवणारा स्वाभिमान काय कामाचा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीकास्त्र सोडलं.
शिवसेनेविरोधात कोणतीही टीका करणार नाही असं राणे पितापुत्रांनी जाहीर केलं आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर राणे पिता-पुत्र गप्प बसणार की त्यांच्या आक्रमक स्वभावानुसार पलटवार करणार हे पहावं लागले.