Nitesh Rane VS Nilesh Rane | नितेश राणेंची शिवसेनेबाबत मवाळ भूमिका, निलेश राणेंचा विरोध कायम
नितेश राणेंची शिवसेना आणि ठाकरेंसोबत निवडणुकीत काम करणार असल्याची भूमिका निलेश राणे यांना पटली नाही.
मुंबई : शिवसेनेचा विरोध असतानाही भाजपने नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंना कणकवलीमधून उमेदवारी दिली. युतीचे उमेदवार असल्याने नितेश राणेंनीही मवाळ भूमिका घेत शिवसेनेवर टीका करणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र यावरुन नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत.
नितेश राणेंची शिवसेना आणि ठाकरेंसोबत निवडणुकीत काम करणार असल्याची भूमिका निलेश राणे यांना पटली नाही. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंच्या विधानाला विरोध केला. "नितेशच्या या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षाने राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरुनच करणार", असं ट्वीट निलेश राणेंनी केलं. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षानी राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार. pic.twitter.com/cIJI54faMG
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 13, 2019
काय म्हणाले होते नितेश राणे?
प्रचारात शिवसेना आणि ठाकरे यांच्यावर कसलीही टीका करणार नाही. मी निवडणूक माझ्या मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी लढवतोय. आम्ही मुख्यमंत्र्यांना शब्द दिलेला आहे, तो तंतोतंत पाळलेला आहे. आम्ही वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवत असल्याने आम्हाला शिवसेनेवर टीका करण्याची गरज नाही. माझ्यासमोर शिवसेनेचा उमेदवार असला तरीही माझ्यामुळे कुठलाही संघर्ष होणार नाही. तर वैयक्तिक वैर निर्माण करण्यासाठी विधानसभेत जात नसून गरज असल्यास आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास मी तयार आहे, असं नितेश राणेंनी म्हटलं होतं.