एक्स्प्लोर
स्वत:च्या मतदारसंघात स्वत:ला मतदान करु न शकलेले उमेदवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं. परंतु यामध्ये अनेक उमेदवार असेही होते, ज्यांना स्वत:च्या मतदारसंघात स्वत:साठी मत देता आलं नाही.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल (21 ऑक्टोबर) मतदान पार पडलं. सामान्य मतदार, उमेदवार, राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी आपला हक्क बजावला. परंतु यामध्ये अनेक उमेदवार असेही होते, ज्यांना स्वत:च्या मतदारसंघात स्वत:साठी मत देता आलं नाही. या उमेदवारांमध्ये आदित्य ठाकरे, ऋतुराज पाटील, चंद्रकांत पाटील, प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. याला कारण म्हणजे उमेदवार म्हणून असलेला मतदासंघ आणि मतदार म्हणून असलेला मतदारसंघ वेगवेगळा आहे.
आदित्य ठाकरे आणि अभिजीत बिचुकले
निवडणूक लढवणारा ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरलेले शिवसेनेचे आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंनी त्यांना आव्हान दिलं आहे. मात्र वरळी मतदारसंघात या दोघांचंही मतदान नाही. आदित्य ठाकरे यांचं वांद्रे पूर्व मतदारसंघात तर अभिजीत बिचुकलेंचं नाव सातारा मतदारसंघात आहे. त्यामुळे दोघांनी मतदानाचा अधिकार तर बजावला पण वरळी मतदारसंघात ही स्वत:ला मत देण्याची इच्छा पूर्ण झाली नाही.
ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक
कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात बिग फाईट म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ. या ठिकाणी सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील आणि धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक रिंगणात आहेत. मुन्ना आणि बंटी यांच्यामधील वाद जगजाहीर आहे. त्यामुळेच तिसऱ्यांदा ही दोन्ही घराणी समोरासमोर आली आहेत. मात्र असं असलं तरी जे दोन उमेदवार कोल्हापूर दक्षिणमध्ये निवडणूक लढवत आहेत, त्या दोघांचेही मतदान या मतदारसंघात नाही. अमल महाडिक यांचं हातकणंगले मतदारसंघात तर ऋतुराज पाटील यांचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नाव आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी मतदानाचा अधिकार बजावला, मात्र स्वतःला मत टाकून घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही.
चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुणे-कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपच्या दृष्टीने कोथरुड हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. चंद्रकांत पाटील यांनीही काल मतदानाचा हक्क बजावला. परंतु त्यांना कोथरुड मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत, तिथे त्यांना मतदान करता आलं नाही. कारण चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघात मतदान केलं. कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना मनसेच्या किशोर शिंदेंचं आव्हान आहे.
प्रणिती शिंदे
सोलापुरातील आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे वडील तसंच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आईसोबत काल मतदान केलं. प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील जागृती विद्यामंदिर नेहरुनगर इथे मतदान केलं. मात्र निवडणुकीतील उमेदवार म्हणून सोलापूर मध्य हा प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ असला, तरी त्यांचं मतदान सोलापूर दक्षिण मतदारसंघात आहे. त्यामुळे प्रणिती यांना स्वत:ला मतदान करण्याचं भाग्य मिळालं नाहीच, पण सुशीलकुमार शिंदे आणि प्रणितींच्या आईंनाही त्यांना मत देता आलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement