सदा सरवणकर शिवतीर्थच्या गेटवर पोहोचूनही माहीमची चर्चा का फिस्कटली? राज ठाकरेंसमोर कोणतं प्रपोझल
Amit Thackeray Sada Sarvankar: सदा सरवणकर यांना माघार घ्यायला लावण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले होते
Amit Thackeray Sada Sarvankar मुंबई: मुंबईतील माहीम विधानसभेत आता तिरंगी लढत निश्चित झाली आहे. मनसेचे अमित ठाकरे (Amit Thackeray), शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत (Mahesh Sawant) हे एकमेकांना भिडणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने आता माहीम मतदारसंघात जबरदस्त ट्विस्ट निर्माण झाला आहे. काल शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार हे जवळपास निश्चित झाले असताना, आयत्या क्षणी त्यांनी तो मागे घेतला नाही, यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पण सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही? याची इन साईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
शिवसेनेचा प्रस्ताव, शिवतीर्थावर धाडला-
सदा सरवणकर यांना माघार घ्यायला लावण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले होते, अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर सरवणकर हे तयारही झाले होते, मात्र त्याबदल्यात शिवसेनेकडून एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. शिवसेना, माहीमची जागा सोडेल मात्र मनसेने शिवसेनेच्या विरोधातील 10 जागांवर उभे केलेले उमेदवार घ्यावे असा हा प्रस्ताव होता. या 10 जागा कोणत्या असतील हे देखील जवळपास निश्चित झाले होते. हा निरोप शिवतीर्थावर पोहचला, कोणत्या जागा असतील हे देखील सांगण्यात आले. त्यावर राज ठाकरे तयार देखील झाले होते, असे सूत्रांनी सांगितले. काल दुपारपर्यंत या घडामोडी पडद्याच्या मागे घडत होत्या, मात्र त्यापुढे काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची ही चर्चा फिस्कटली अशी माहिती समोर येत आहे.
राज ठाकरेंनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात केलेलं विधान मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी लागलं-
एबीपी माझाच्याच कार्यक्रमात राज ठाकरे पक्ष आणि चिन्हावरून जे बोलले ते देखील शिवसेनेच्या नेत्यांना रुचले नाही, त्यामुळे सर्व ठरले असताना, सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. अर्ज मागे घेण्याच्या आधी समोरासमोर बसून चर्चा व्हावी, असे मत शिवसेना नेत्यांचे होते मात्र सदा सरवणकर यांना भेट नाकारल्याने शिवसेनेने अमित ठाकरेंच्या विरोधात लढणार नसल्याचा जो निर्णय घेतला होता तो मागे घेतला.
माहीममधील Inside Story, Video:
संबंधित बातमी:
सदा सरवणकरांनी शेवटच्या दिवशी मोठा गेम खेळला, राजकीय नाट्याचा फोकस स्वत:वर ठेवत मास्टरस्ट्रोक मारला