(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola Gram Panchayat Election Results : व्याळा आणि धारुर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, अकोट तालुक्यात सर्वच पक्षांना जनतेचा कौल
Akola Gram Panchayat Election Results : अकोला ग्रामपंचायत निकालात शिवसेनेने बाजी मारत दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. व्याळा आणि धारुर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
Akola Gram Panchayat Election Results : अकोला (Akola) जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Election 2022) आज मतमोजणी पार पडली. या निवडणूक निकालात शिवसेनेने (Shiv Sena) बाजी मारत दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या बाळापूर तालुक्यातील व्याळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. व्याळाच्या सरपंचपदी शिवसेनेच्या गजानन वजीरे दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांनी 1529 मतं घेत तब्बल 600 मतांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला आहे. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.
दरम्यान, अकोट तालुक्यातील आदिवासी भागातील सातही ग्रामपंचायतींचे निकालही संमिश्र आहेत. अकोट तालुक्यात सर्वाधिक तीन ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाड्या आणि अपक्षांनी बाजी मारली आहे. तर प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे. अकोटमधील अमोना ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. तर सोमठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी कुणीच अर्ज दाखल न केल्याने ते पद रिक्त आहे.
व्याळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील मोठं गाव असलेल्या व्याळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. बाळापूरचे शिवसेना आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. व्याळा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या वर्षा वजीरे निवडून गेल्या आहेत. आता सरपंचपदावरही त्यांच्याच कुटुंबातील गजानन वजीरे विजयी झाले आहेत. त्यांनी 1529 मतं घेत तब्बल 600 मतांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला आहे. 13 सदस्य असलेल्या व्याळा ग्रामपंचायतीवर शिवसंग्रामचे नेते पुरुषोत्तम मांगटे पाटील यांच्या गटाचे तब्बल पाच सदस्य निवडून आले आहेत. या ग्रामपंचायतीत सदस्यसंख्येत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
अकोट तालुक्यातील मतदारांचा संमिश्र 'कौल'
अकोट तालुक्यात सर्वाधिक तीन ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाड्या आणि अपक्षांनी बाजी मारली आहे. तर प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे. अकोटमधील अमोना ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. तर सोमठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी कुणीच अर्ज दाखल न केल्याने ते पद रिक्त आहे.
तालुक्यातील गुल्लरघाटच्या सरपंचपदी बच्चू कडूंच्या प्रहार समर्थित पॅनलचे प्रकाश डाखोरे विजयी झाले आहेत. तर पोपटखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंचित बहुजन आघाडीचे विजेंद्र तायडे विजयी झाले आहेत. तायडे यांनी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आणली आहे. शिवपूर-कासोद ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष माया मनिष महल्ले विजयी झाल्या आहेत. धारगडच्या सरपंचपदी अपक्ष संजय माणिक ठाकरे विजयी झाले आहेत. धारुर-रामापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजू धुंदे विजयी झाले आहेत. तर अमोनाच्या सरपंचपदी मदन बाबूलाल बेलसरे हे अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अकोट तालुक्यातील निवडणुकीत भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे.
ग्रामपंचायत निकालात आमदार नितीन देशमुख 'पास' तर भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे 'नापास'
शिवसेनेने जिल्ह्यात दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. बाळापूरचे आमदाप नितीन देशमुखांनी एकमेव निवडणूक झालेली व्याळा ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. तर भाजपचे आमदार असलेल्या अकोट तालुक्यातील धारुर ग्रामपंचायतीवरही सत्ता स्थापन केली आहे. आमदार नितीन देशमुख हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुखही आहेत. मात्र, भाजपचे अकोटचे आमदार यांना आपल्या तालुक्यातील निवडणुकीत फारशी चमक दाखवता आली नाही. आमदार भारसाकळे यांच्याविरोधात जनतेची नाराजी अशीच राहिली तर त्याचे पडसाद अकोट नगरपालिका निवडणुकीतही उमटण्याची चिन्ह आहेत.
अकोला जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीचे निकाल
अकोट तालुका :
1) गुल्लरघाट : सरपंचपदी बच्चू कडूंच्या प्रहार समर्थीत पॅनलचे प्रकाश डाखोरे विजयी.
2) पोपटखेड : सरपंचपदाच्या निवडणुकीत वंचितचे विजेंद्र तायडे विजयी. पांडुरग तायडे संपूर्ण बहूमतासह विजयी.
3) शिवपूर-कासोद : सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष माया मनिष महल्ले विजयी.
4) धारगड : ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत अपक्ष संजय मानिक ठाकरे विजयी.
5) धारुर-रामापूर : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजू धुंदे विजयी.
6) अमोना : मदन बाबूलाल बेलसरे हे अपक्ष उमेदवार सरपंचपदी बिनविरोध निवडून आले.
7) सोमठाणा : सरपंचपद अर्जच न आल्याने रिक्त आहे.
बाळापूर तालुका
8) व्याळा : सरपंचपदी शिवसेनेचे गजानन वजीरे 1529 मते घेत विजयी. वजीरेंचा 600 मतांनी सरपंचपदी विजय.
अकोला : सरपंचपदाचं पक्षीय बलाबल
एकूण जागा : 08
निवडणूक झाली : 07
रिक्त : 01
शिवसेना : 02
वंचित : 01
प्रहार : 01
अपक्ष : 03
रिक्त : 01