अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर; मोर्शीमधून देवेंद्र भुयार तर भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर यांना उमेदवारी, नवाब मलिकांचा उल्लेख नाहीच!
Ajit Pawar NCP 4th List : राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
Ajit Pawar NCP 4th List : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) आणि महायुतीकडून (Mhayuti) जागावाटपाचा तिढा सोडवला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मोर्शीमधून देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) तर भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून चौथ्या यादीत 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मोर्शीमधून देवेंद्र भुयार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र भुयार हे अपक्ष आमदार असताना त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. आता भुयार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. तर, दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महत्त्वाचं म्हणजे, चौथ्या यादीत देखील नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अर्ज भरणार की, पक्षाकडून आगामी विधानसभेसाठी अर्ज दाखल करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच, आणखी एक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे, मोर्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमनेसामने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र भुयार तर भाजपकडून उमेश यावलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नवाब मलिक आज अर्ज भरणार?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. पण, या चौथ्या यादीतही नवाब मलिकांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. अशातच नवाब मलिकांनी यापूर्वीच आपण यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. पक्षानं तिकीट दिलं नाहीतर, आपण अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असं नवाब मलिकांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. आज नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अपक्ष लढणार की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढणार? हे अद्याप अस्पष्ट असून मलिक नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.