(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अजित पवार गट ॲक्शन मोडमध्ये; पक्ष चिन्हाबाबत वृत्तपत्रांमध्ये दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?
Ajit Pawar: घड्याळ चिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी दिल्याचा मजकूर आज वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आला आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या गटाला 36 तासांमध्ये वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्याचे आदेश दिले होते. वर्तमानपत्रात मराठी भाषेत घड्याळ चिन्हाबाबत निर्णय न्यायप्रविष्ट असल्याविषयीचा मजकूर 36 तासांमध्ये प्रसिद्ध करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर 24 तासांच्या आतमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वर्तमान पत्रात जाहिरात देण्यात आली आहे. घड्याळ चिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी दिल्याचा मजकूर आज वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आला आहे.
काय मजकूर आहे वृत्तपत्रांमध्ये?
भारत निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील नॅशनालिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीला "घड्याळ" हे चिन्ह दिले आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर न्याय प्रविष्ट आहे. अंतिम निकालाच्या आधीन राहून माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी नॅशनालिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीला आगामी सर्व निवडणुकांसाठी "घड्याळ" हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष अजित पवार यांनी काल (बुधवारी 6 नोव्हेंबर) न्यायालयाला आश्वासन दिले होते. 36 तासांच्या आतमध्ये मराठी वृत्तपत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ चिन्हाबाबत अस्वीकरण प्रसिद्ध केले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या घड्याळ चिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून निवडणुकीच्या काळात न्यायप्रविष्ट असलेलं घड्याळ चिन्ह वापरलं जात आहे, असं या अस्वीकरण पत्रकात असेल असं नमूद करण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तोंडी निर्देशाला उत्तर देताना अजित पवार यांच्यावतीने ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी हे आश्वासन दिलं होतं.
सुनावणीनंतर 24 तासांच्या आतमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाकडून वर्तमान पत्रात जाहिरात दिली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी दिल्याचा मजकूर लिहिला आहे.कालच सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या पक्षाला 36 तासांच्या आत जाहिरात देण्याचे निर्देश दिले होते. जाहिरात दिल्यावर तस प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या देखील सूचना दिल्या होत्या. दिल्ली आवृत्तीत देखील अजित पवार यांच्या पक्षाकडून जाहिरात देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाला) घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून थांबण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने दाखल केलेल्या अर्जावर काल(बुधवारी) सुनावणी पार पडली. या अर्जाद्वारे शरद पवारांच्या वतीने अजित पवारांना निवडणूक लढवण्यासाठी नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याचे निर्देश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आलेली होती.