2 वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? प्रीतिसंगमावर अजित पवार थेट म्हणाले, आमचं आम्ही...
राज्यात सध्या नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आला आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सातारा : विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळाल्यानंतर राज्यात आता सत्तास्थापनेला वेग आला आहे. राज्याच्या पुढच्या मुख्यमंत्र्याची निवड करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. महायुतीमध्ये भाजपा हा सर्वांत मोठा पक्ष असला तरी मुख्यमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असल्याचं म्हटलं जातंय. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षातील नेतेदेखील आमच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी करत आहेत. यावरच आता अजित पवार यांनी उत्तर दिलंय.
आमची काळजी करायला आमचे...
अजित पवार आज (25 नोव्हेंबर) साताऱ्यातील कराड येथे प्रतिसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मसाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरं दिली. तुम्हाला दोन वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना "इतरांनी काय बोलायचं ते बोलावं. प्रत्येकाने आपल्या जवळ काय आहे हे पाहायला पाहिजे. आमची काळजी करू नये. आमची काळजी करायला आमचे आमदार, महायुती, माझ्या पक्षासोबत असणारे नेते, कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत," असं अजित पवार म्हणाले. तसेच निदान दोन वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? जनतेची तशी इच्छा आहे, असं विचारल्यानंतर आमचं आम्ही बघू, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्रिपदावर थेट बोलणं टाळलं.
...त्याला यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा होता का?
यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील महिला मतदारांचेही आभार मानले. आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्याच विचाराने पुढे जात आहोत. आमच्या प्रत्येक फ्लेक्सवर यशवंतराव चव्हाण यांचाच फोटो असतो. आणखी किती दिवस आम्हाला नाव ठेवणार आहात. 1978 साली जी घटना घडली त्याला यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा होता का. सगळं सोईचं राजकारण चालत नाही. आम्ही केलं की ते चुकीचं म्हटलं जातं. आम्ही शिव,शाहू, फुले, आंबेडकर यांच्याच विचाराने चालत आहोत, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :