एक्स्प्लोर
Advertisement
घोषणाबाजी कराल तर तिकीटच देणार नाही, अजित पवारांचा दम अन् कार्यकर्ते शांत
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून द्या. सहा महिन्यात शास्ती कर (अनधिकृत बांधकामावर आकारला जाणार दंड) माफ केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असणारे उमेदवार आणि त्यांच्या उतावळ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी सज्जड दम भरला. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर मेळाव्यात हा प्रकार घडला. मेळावा सुरु असताना इच्छुक उमेदवारांनी शक्ती-प्रदर्शन केलं. या उमेदवारांच्या उतावळ्या कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्याला तिकीट मिळावं म्हणून पोट तिडकीने घोषणाबाजी सुरू ठेवली. पण यावेळी अजित पवार संतापले, आता जर कोणी घोषणाबाजी केली तर तिकीटच देणारच नाही असं सज्जड दम भरला आणि कार्यकर्ते शांत झाले.
या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले आहेत. आघाडीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. लवकरच उमेदवारी जाहीर करतो, कोणी नाराज व्हायचं नाही, असेही पवार म्हणाले. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून द्या. सहा महिन्यात शास्ती कर (अनधिकृत बांधकामावर आकारला जाणार दंड) माफ केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की समोर बसलेला कार्यकर्ता आमच्यासोबत आहे, त्यामुळे आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी मध्यंतरी व्यस्त असल्याने पिंपरी चिंचवड शहरात येऊ शकलो नाही. तर बातम्या आल्या अजित दादा शहरवासियांना विसरले. मी मरेपर्यंत विसरणार नाही. मी कधीही येईन, कधीही जाईन हे आमचं आम्ही ठरवू, कार्यकर्ते आणि आमच्यात कोणी ढवळा-ढवळ करू नये, असेही पवार म्हणाले.
ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. पण आपले सरकार आल्यावर त्यांना आपल्याकडे घ्या असं तुम्ही म्हणू नका. मी तर कुणाला परत पक्षात घेणार नाही. पण तुम्ही येऊन सांगू नका, दादा घ्या हो पदरात पाडून. अरे आपला पदर फाटला, पदरात पाडून घेता-घेता, असे म्हणत अजित पवारांनी गयारामांवर निशाणा साधला.
यावेळी युतीवर बोलताना पवार म्हणाले की, किती ही तानलं तरी युती ही होणार आहे. शिवसेना बॅकफूटवर आहे. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची राहिली नाही. बाळासाहेब कमळीला वापरायचे, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, असे ते म्हणाले. वंचित आघाडी नसती तर आपले 12-13 खासदार वाढले असते. वंचितमुळे फटका बसल्याची कबुली त्यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement