(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Board 10th Result : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचं कौतुक; तर वर्षा गायकवाडांनी सांगितली निकालाची वैशिष्ट्ये
Maharashtra Board 10th Result : पास झालेल्या विद्यार्थ्यांवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Maharashtra Board 10th Result : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दहावीच्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केलं आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावीच्या निकालाची घोषणा आज करण्यात आली. यंदाचा निकाल हा 96.94 टक्के लागला आसून मुलींनी या निकालात बाजी मारली आहे. पास झालेल्या विद्यार्थ्यांवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
मुख्यमंत्र्यांनी केलं विद्यार्थ्यांचे कौतुक
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. " शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहे, या यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि डोळसपणे पावले टाका. अभ्यासात मेहनतीची तयारी ठेवा, यश निश्चितच मिळेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!" असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
वर्षा गायकवाड यांनी सांगितली निकालाची वैशिष्ट्ये
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील एका व्हिडीओच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, 'आज दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. पास झालेल्या विद्यार्थ्यांचे मी कौतुक करते. तसेच त्यांच्या पालकांचे देखील कौतुक करते. आपल्या राज्याचा निकाल हा 96.94 टक्के लागला आहे. मी तुम्हा दहावीच्या निकालाची काही वैशिष्ट सांगू इच्छिते. नियमित विद्यार्थ्यांपैकी जवळपास 40 टक्के मुलांना 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. जवळपास 77 टक्के मुलांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ही खुप कौतुकास्पद गोष्ट आहे. ' तसेच वर्षा गायकवाड यांनी पुढे सांगितले की, '24 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. कोरोनाच्या काळात ही परीक्षा घेण्यात आली होती, त्यामुळे मी बोर्डानं केलेल्या कामाचं देखील मी कौतुक करते.'
अनुत्तीर्ण विद्यार्थांनी खचून जाऊ नका: अजित पवार
'विद्यार्थ्यांनी आपली आवड, कल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावी, परीक्षेतील यशाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न करावा', असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, यंदा 96.94 टक्के विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा असला तरी अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शैक्षणिक कारकिर्दीच्या बरोबरीनं आपलं व्यक्तिमत्व अष्टपैलू, सर्वांगसुंदर घडविण्याचा प्रयत्न करावा. शैक्षणिक कारकिर्द ठरवण्यासाठी योग्य शाखा निवडण्याचा दहावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कला, क्रीडा, छंद आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा', असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Maharashtra ssc result 2022 declared : दहावीचा निकाल 96.94 टक्के! कोकण विभागाची बाजी, जाणून घ्या विभागनिहाय निकाल
- SSC Result 2022 : 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 29 शाळांचा निकाल शून्य टक्के, दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI