School Reopen | कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता
कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सचा हिरवा कंदील.
मुंबई : राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरू होणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. यावर राज्यातील चाइल्ड टास्क फोर्सने कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास शाळा दिवाळीनंतर सुरू कराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शाळा दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत याआधी शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यासोबत तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता अनेक मोठ्या शहरात शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. आता मात्र शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकराने नेमलेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असून कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
गणेशोत्सवात कोरोनाचे आकडे फारसे वाढलेले दिसत नाहीये. शिवाय आणखी गणेशोत्सवनंतरचे 10 ते 12 दिवस कोरोना स्थितीचा आढावा घेऊन सोबतच दिवाळी सारख्या मोठ्या सणाच्या दरम्यान कोरोना परिस्थिती पाहून दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे चाइल्ड टास्क फोर्स सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले. त्यामुळे त्यानुसार नियोजन आता राज्य सरकार, शिक्षण विभागाला करायचे आहे.
राज्यात शाळा, महाविद्यालयं दिवाळीनंतर सुरु? टास्क फोर्स सकारात्मक तर अजित पवारांचंही महत्वाचं भाष्य
शाळा सुरू करण्यापूर्वी याआधी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत त्याबाबतची तयारी शिक्षण विभागला करायची आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळा सॅनिटाइज करणे, शाळेत आरोग्य कक्ष तयार ठेवणे अशी तयारी शिक्षण विभागाला या दरम्यान पूर्ण करायची आहे. टास्क फोर्स किंवा राज्य सरकारच्या शाळा सुरू करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना या जिल्हास्तरावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पाळायच्या आहेत. त्यामुळे स्थानिक कोरोना परिस्थितीचा विचार करून त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबतचा नियोजन जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या आदेशानुसार होईल. शिक्षण विभागाने लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांचा डेटा मागवला असून शाळा सुरू करण्याबाबतची तयारी सुरू ठेवली आहे. सोबतच मुंबई महापालिका शिक्षण विभाग सुद्धा शाळा सुरू करण्याबाबतच्या तयारीचा नियोजन करत असल्याचे सांगितले जात आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI